News Flash

आपण भूमिकाच घेत नाही – नाना पाटेकर

‘आपण भूमिकाच घेत नाही. आपल्याला सर्वाच्या ‘गुड बुक्स’मध्ये राहायचे असते. प्रत्येक जण भांडू शकत नसला तरी आपण किमान गर्दीचा भाग तरी होऊ शकतो.

‘आपण भूमिकाच घेत नाही. आपल्याला सर्वाच्या ‘गुड बुक्स’मध्ये राहायचे असते. प्रत्येक जण भांडू शकत नसला तरी आपण किमान गर्दीचा भाग तरी होऊ शकतो. शेतकऱ्यांना मदत करणे ही माझी गरज नाही. माझ्यातला माणूस टिकवणे ही गरज आहे. नाहीतर मी माणूस आणि नट म्हणून मरून जाईन,’ अशा भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केल्या.
मनोविकास प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेल्या व लेखक अच्युत गोडबोले व नीलांबरी जोशी लिखित ‘लाईमलाईट- विदेशी चित्रपटसृष्टीची अनोखी यात्रा’ या पुस्तकाचे शुक्रवारी पाटेकर आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. या वेळी पाटेकर बोलत होते. प्रकाशक अरविंद पाटकर या वेळी उपस्थित होते.
पाटेकर म्हणाले, ‘नाम’च्या निमित्ताने मराठवाडा, खान्देश व विदर्भात गेल्यावर माणसे व त्यांचे दु:ख पाहताना माझ्या दु:खाच्या व्याख्या बदलत गेल्या. आपली दु:खे चार भिंतीतली आहेत. आज लोकांनी ‘नाम’साठी ३० कोटी रुपये दिले पण गेल्या ६७ वर्षांत दुष्काळी भागात पाणी आणि वीज या मूलभूत गोष्टी आपण देऊ शकलो नाही. ‘पाणी व वीज या दोन गोष्टी दिल्यावर आम्ही तुमच्याकडे तोंड वेंगाडायला येणार नाही. आम्हाला कर्जमाफी नको. पण मुळातच आम्हाला वंचित ठेवणे ही कदाचित तुमची गरज असेल,’ हे तिथे गेल्यावर लक्षात येते. पक्ष कुठला हा महत्त्वाचा मुद्दा नाही. येणाऱ्या पक्षाचे नाव बदलते, मंडळी तीच राहतात. मी नट म्हणून जे बोलतो तेव्हा मला बक्षिसे दिली जातात आणि तीच गोष्ट दुसऱ्या बाजूला उभे राहून मांडली तर मी बंडखोर ठरतो. तिथून ओरडलो तर माझा कन्हैया होईल, मला पकडतील आणि तेच इथून बोललो की माझा कृष्ण होतो. जागा बदलली की भूमिका बदलते. प्रत्येक ठिकाणी तीच भूमिका का नाही?’
‘पोटासाठी जे मागतात, झगडतात त्यांना पटकन ‘कम्युनिस्ट’ असा बिल्ला लावला जातो. मूलभूत गोष्टींसाठी भांडणारा कम्युनिस्ट डाव्या विचारसरणीचा आहे असे आपण म्हणतो. त्याला पोट आहे हे फक्त आपण समजून घेत नाही. हे दुर्दैव आहे,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
जुने चित्रपट व जुन्या अभिनेत्यांविषयी पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी पाटकर, गोडबोले कुटुंबीय, प्रशांत वैद्य आणि इतरांकडून ‘नाम फाऊंडेशनला’ अडीच लाखांहून अधिक निधी सुपूर्द करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:10 am

Web Title: i am not role accept nana patekar
टॅग : Nana Patekar
Next Stories
1 ससूनमधील संपकरी डॉक्टर बाह्य़रुग्ण विभागातील सेवा सुरू करण्याची शक्यता
2 शहीद कर्नल महाडिक यांच्या घरी उभारली शौर्य गुढी
3 जैन संस्कार हा भारतीय विचारांचा आत्मा – अभय फिरोदिया
Just Now!
X