स्वॅब सेंटर बंद करण्याचा धक्कादायक प्रकार; प्राणवायू सुविधा कार्यान्वित करण्याची कामेही रखडली

पुणे : करोनाबाधित रुग्णांचा हॉटस्पॉट ठरलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील लायगुडे रुग्णालयातील स्वॅब सेंटर बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्राणवायू सुविधा कार्यान्वित करण्याची कामे रखडल्यामुळे करोनाबाधित रुग्णांना सुविधा असूनही येथे दाखल करून घेतले जात नसतानाच आता स्वॅब सेंटरही बंद करण्यात आले आहे.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने हा मनमानी निर्णय घेतला असून या निर्णयामुळे रुग्णांना गैरसुविधेला सामोरे जावे लागत असून सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे  उद्यानातील एकमेव स्वॅब सेंटरवर अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, सिंहगड हॉस्टेल परिसरातील स्वॅब सेंटर पु. ल. देशपांडे उद्यानात स्थलांतरित करण्यात आले आहे.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या सनसिटी, धायरी, हिंगणे, माणिकबाग, वडगांव, धायरी परिसरातील करोनाबाधित रुग्णांच्या स्वॅब तपासणीची सुविधा महापालिकेकडून दोन ठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती. धायरी परिसरातील महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयाबरोबरच सिंहगड हॉस्टेल परिसरात स्वॅब सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते.

शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू  झाल्यानंतर लायगुडे रुग्णालयात प्राणवायू सुविधा कार्यान्वित करण्याचे आणि सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्याची सुविधा देण्याचे आरोग्य विभागाकडून निश्चित करण्यात आले. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित होऊ  न शकल्यामुळे करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डवरील माहिती पाहून रुग्णांना अन्य रुग्णालयात किंवा करोना काळजी केंद्रात दाखल होण्यास रुग्णालयाकडून सांगण्यात येत होते. त्याचा फटका गंभीर अवस्थेतील रुग्णांना बसत होता. प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा मिळविण्यासाठी रुग्णांना धावाधाव करावी लागत असतानाच आता स्वॅब सेंटर बंद केल्यामुळे रुग्णांच्या त्रासात भर पडली असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लायगुडे रुग्णालयात दिवसभरात सरासरी शंभर रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने घेतले जात होते. गेल्या शनिवारपर्यंत (५ सप्टेंबर) येथे रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली. मात्र सोमवारपासून स्वॅब सेंटर बंद करण्याचा आदेश सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून देण्यात आला. आरोग्य विभागाला पूर्व कल्पना न देता क्षेत्रीय कार्यालयाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग अन्य रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. सध्या या रुग्णालयात केवळ बारुग्ण विभाग ( ओपीडी) आणि लसीकरण सुविधा सुरू आहे.

पाठपुरावा सुरू

रुग्णालयातील स्वॅब सेंटर बंद करण्याचा आदेश मिळाला आहे. केंद्र सुरू करण्यासंदर्भात क्षेत्रीय कार्यालय आणि आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. आरोग्य विभागाला क्षेत्रीय कार्यालयाच्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे, असे लायगुडे रुग्णालयातील करोना केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी शहा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लायगुडे रुग्णालयात कर्मचारी वर्ग कमी प्रमाणात आहे. त्यामुळे केंद्र बंद करण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात ही सुविधा आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

— जयश्री काटकर, सहाय्यक आयुक्त, सिंहगड  रोड क्षेत्रीय कार्यालय