यंदा एकाही गावाला ‘लाल कार्ड’ नाही

पुण्यातील पिण्याच्या पाणीस्रोतांच्या स्वच्छता सर्वेक्षणात यंदाही एकाही गावाला ‘लाल कार्ड’ मिळालेले नाही. मान्सून पावसाच्या आगमनापूर्वी जिल्ह्य़ात केलेल्या या सर्वेक्षणात गेल्या चार वर्षांत आरोग्याच्या दृष्टीने अतिजोखमीच्या आणि मध्यम जोखमीच्या असलेल्या सार्वजनिक पाणीस्रोतांची संख्याही घटल्याचे दिसून आले आहे. पाण्यावाटे पसरणाऱ्या साथीच्या रोगांचा धोका ओळखणे असा या सर्वेक्षणाचा उद्देश असतो.

आरोग्य विभागातर्फे वर्षांत दोनदा हे सर्वेक्षण केले जाते. नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा, हातपंप आणि विहिरींच्या आजूबाजूची स्वच्छता तपासण्यासाठी त्या-त्या पाणीस्रोताला भेट देऊन काही विशिष्ट बाबींची नोंद केली जाते. पाण्याच्या स्रोताभोवतीचा परिसर अस्वच्छ आहे का, स्रोतापासून १५ मीटर अंतरापर्यंत सांडपाणी साचून राहते का, पाणीस्रोच्या सर्वात जवळ असलेल्या शौचालयाचे वा गुरांच्या गोठय़ाचे स्थान कुठे आहे, मागच्या तीन महिन्यांमधील पाण्याचा नमुना पिण्यायोग्य आहे का, अशा विविध गोष्टी नोंदल्या जातात. यातील निकषांवर त्या स्रोतातील पाणी पिण्यास कितपत चांगले हे ठरवले जाते, तसेच त्या पाणीस्रोतावर गावातील किती लोकसंख्या अवलंबून आहे यावरून पाणीपुरवठय़ासाठी लाल, पिवळे वा हिरवे कार्ड दिले जाते.

जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील १३ तालुक्यांमध्ये २०१३ मध्ये ९ गावांना लाल कार्ड देण्यात आले होते, २०१४ मध्ये ही संख्या ४ झाली आणि नंतर गेली दोन वर्षे एकाही गावाला लाल कार्ड मिळालेले नाही. तसेच पिवळे कार्ड मिळवणाऱ्या गावांची संख्याही २०१४ नंतर कमी झाली. यंदा ८४ गावांना पिवळे कार्ड मिळाले असून त्यातील ३४ गावे जुन्नरमधील आहेत.