News Flash

‘माळढोक’मधील काळविटांची स्वतंत्र गणना!

माळढोकांसाठीचे अभयारण्य सोलापूर आणि अहमदनगरमध्ये पसरले असून हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

माळढोक अभयारण्यांमध्ये माळढोकांबरोबरच महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या काळविटांची स्वतंत्र गणना सप्टेंबरमध्ये होणार आहे. ही प्रत्यक्ष गणना नसून काळविटांचे अधिवास बदलले तशी काळविटे कशी विखुरली गेली याविषयी सर्वेक्षणाद्वारे माहिती घेतली जाणार आहे. त्यातूनच काळविटांच्या संख्येचाही अंदाज बांधला जाईल.

पुण्याचा वन विभाग आणि ‘बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ (बीएनएचएस) यांच्यातर्फे निसर्गप्रेमींची मदत घेऊन हे सर्वेक्षण केले जाणार आहे. मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये म्हणाले,‘‘१९९५ ते १९९७ च्या दरम्यान सिंचन कालवे मोठय़ा प्रमाणावर अस्तित्वात नसताना नान्नज, मारडी येथे काळविटे कळपांमध्ये दिसायची. हे कालवे आल्यानंतर मात्र काळविटे विखुरली. वन विभागाच्या जमिनीसह आसपासची शेते, पाणीसाठे, सिंचनाखालील जमीन या सर्व भागात काळविटे दृष्टीस पडतात. काळविटांच्या सर्वेक्षणात त्या-त्या ठिकाणच्या गवताळ प्रदेशांची गुणवत्ताही कळेल.’’

माळढोकांसाठीचे अभयारण्य सोलापूर आणि अहमदनगरमध्ये पसरले असून हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीने १९८० च्या दशकात दुष्काळग्रस्त भागांसाठी ‘ड्राऊट प्रोन एरियाज प्रोग्रॅम’ सुरु झाला. या प्रकल्पाअंतर्गत वन विभागाच्या जमिनीवर चराऊ आणि गवताळ राने तयार करण्याचे प्रयत्न झाले. यामुळे गवत खाणाऱ्या वन्यप्राण्यांचे अधिवास वाढून काळविटांसारख्या प्राण्यांना सुरक्षिततेसाठी त्याचा फायदा झाला होता. असे असले तरी सर्वसाधारणत: गवताळ प्रदेश हे पडीक जमीन म्हणूनच गणले जात असून ९० च्या दशकात शासनानेच या प्रदेशांवर झाडे लावली. यात चटकन वाढणारी विदेशी झाडे लावली गेली. यामुळे, तसेच मोठमोठय़ा रस्त्यांमुळे काळविटांचे अधिवास विखुरले गेले आणि काळविटांना नवीन प्रदेश शोधणे भाग पडले. या सर्व गोष्टींमुळे काळविटे कोणत्या प्रदेशावर फिरतात आणि त्यांची अंदाजे संख्या काय, हे जाणून घेणे गरजेचे असल्याची माहिती वन विभागाने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 5:19 am

Web Title: independent calculation stag in maldhok
Next Stories
1 ‘डीवाय’च्या छापासत्रांमागे लाखोंच्या पदव्यांची बोली?
2 माता अमृतानंदमयी मठाकडे एक कोटीची थकबाकी
3 निवडणुकीच्या तोंडावर सांगवीत विकासकामे
Just Now!
X