स्वाइन फ्लूच्या विषाणूमध्ये गेल्या चार वर्षांच्या कालावधीत काही जैविक बदल घडून आले आहेत, परंतु या विषाणूवर स्वाइन फ्लूसाठी देण्यात येणाऱ्या लशीचा तसेच टॅमी फ्लू गोळ्यांचा अपेक्षित परिणाम दिसून येत आहे. पावसाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसून ही साथ सप्टेंबरपासून ओसरू लागेल, अशी माहिती ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’ तर्फे (एनआयव्ही) देण्यात आली.
एप्रिलनंतर मे आणि जूनमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला होता. जुलै आणि ऑगस्टमध्ये तो पुन्हा वाढला आहे. एनआयव्हीमधील एन्फ्लुएन्झा संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. मंजू चढ्ढा म्हणाल्या, ‘‘स्वाइन फ्लूसाठी कारणीभूत ठरणारा ‘एच१एन१’ विषाणू २००९ पासून काही प्रमाणात उत्क्रांत झाला असला तरी तो नवीन प्रकारात (व्हरायंट) आढळून आलेला नाही. उत्क्रांत होणाऱ्या विषाणूवरही स्वाइन फ्लू लस आणि टॅमी फ्लू गोळ्यांचा अपेक्षित परिणाम दिसून येत आहे. ‘एच१एन१’ची ही ‘पोस्ट पॅनडेमिक’ अवस्था असून यात दरवर्षी पावसाळ्यात प्रादुर्भाव वाढणे अपेक्षित असते. त्यामुळे सध्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसत असली तरी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हा प्रादुर्भाव पुन्हा कमी होईल. मात्र फ्लू सदृश लक्षणे दिसू लागताच विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुले, वयस्कर मंडळी तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व मधुमेहासारखे इतर काही आजार असणाऱ्या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी. स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधासाठी वारंवार हात धुणे, श्वसनसंस्थेची स्वच्छता पाळणे, रुग्णांनी आजार न पसरण्यासाठी काळजी घेणे या उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे.’’

स्वाइन फ्लूच्या लक्षणांमध्ये ताप, हुडहुडी भरणे, घसा दुखणे, कफ, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, नाक वाहणे, उलटय़ा, जुलाब आदी लक्षणांचा समावेश असू शकतो.
अधिक धोका कुणाला?
– पाच वर्षांच्या आतील बालके
– ६५ वर्षांवरील व्यक्ती
– गर्भवती स्त्रिया
– दमा, हृदयविकार, मधुमेह, मूत्रविकार असे इतर काही आजार असणाऱ्या व्यक्ती