जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल घडलेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करते. ही संस्था देशासाठी अतिशय महत्वाची आहे. या ठिकाणी जर गुंडागर्दी होत असेल, तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण मावळमधील परंदवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती, यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

याप्रसंगी खासदार सुळे म्हणाल्या की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल घडलेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करते. देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. कारण, दिल्लीत सातत्याने कोणती ना कोणती अशाप्रकारची घटना घडत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती व काळजी वाढत आहे.आज देशात सीएए किंवा मग काल घडलेली घटना असो, याद्वारे सर्व युवा पिढी पहिल्यांदा संघर्ष करताना, सरकारच्याविरोधात लढताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्यामागे कोणाचेही असे ठोस नेतृत्व दिसत नाही. मात्र प्रचंड राग व अस्वस्थता ही या मुलांमध्ये दिसत आहे. युवा पिढीत जर अशा गोष्टी घडल्या तर देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या हितासाठी त्या चिंताजनक आहेत.

आम्ही जरी विरोधात असलो तरी देशाचं ऐक्य आणि विकास हे आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे माझी गृहमंत्री अमित शाह यांना विनंती आहे की, दिल्लीची सुरक्षा ही केंद्र सरकारची जबाबदारी असते, केंद्र सरकारने ताताडीन याबाबत चौकशी करावी व ती पारदर्शक असावी. कारण, शेवटी राजकारण एका ठिकाणी परंतु सुरक्षितता व सुसंस्कृत वागणं हे अतिशय महत्वाचं आहे. असं देखील खासदार सुळे यांनी यावेळी सांगितलं.

तसेच, मी जेएनयूमधील घटनेचा जाहीर निषेध करते. माझी एक नागरिक म्हणून एवढीच अपेक्षा आहे की, या प्रकरणाची पारदर्शक चौकशी झालीचं पाहिजे. हिंदी चित्रपटातील दृश्यांप्रमाणे कालची जेएनयूतील दृश्य दिसत होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन देखील जेएनयूच्या विद्यार्थीनी आहेत. याचबरोबर अनेक दिग्गज या ठिकाणी शिकलेले आहेत. ही संस्था देशासाठी अतिशय महत्वाची आहे. या ठिकाणी जर गुंडागर्दी होत असेल तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे, असंही त्या म्हणाल्या.