जलसंवर्धन अभियानाअंतर्गत खडकवासला धरणातील गाळ काढण्याच्या कामात आता पुण्यातील गणेश मंडळे सहभागी होणार आहेत. पुण्याची वाढती पाण्याची गरज ओळखून हा उपक्रम राबवण्यात येत असून, सर्व मंडळे एकत्रित आली आहेत. या उपक्रमास रविवारपासून (२४ मे) सुरुवात होणार आहे.
याबाबत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, कर्नल सुरेश पाटील यांच्या ‘ग्रीन थंब’ पर्यावरण संस्था यांनी पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व गणेश मंडळाना आमंत्रित करण्यास आले होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. २२ किलोमीटर क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम रविवारपासून (२४ मे) सुरू होणार आहे.
पाटील यांनी या वेळी स्लाइड शोच्या माध्यमातून धरणातील गाळ, त्यामुळे घटलेला पाणीसाठा, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी तसेच संभाव्य अराजक याची माहिती दिली. पाटील म्हणाले, की धरण बांधले गेले, त्या वेळी चार टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता होती. आज ती गाळामुळे दोन टीएमसी होत आहे. एक ट्रक माती काढल्यास एक टँकर पाणीसाठा होतो. त्यामुळे एक लाख ट्रक माती काढली तर, शेतक ऱ्यांना आणि पुणेकरांना पाणी मिळेल. त्याचप्रमाणे पैसाही मोठय़ा प्रमाणात वाचेल. तसेच सरकार याबाबत गंभीर नसून, काहीही करत नाही. त्यामुळे लोक सहभाग आवश्यक आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अशोक गोडसे व महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे अण्णा थोरात, साखळीपीर तालीम मंडळाचे रवींद्र माळवदकर, तुळशीबाग गणेश मंडळाचे विवेक खटावकर, सहकार तरुण मंडळाचे भाऊ करपे आदींनी या वेळी आपली मते मांडली.