निसर्गसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी लाजाळू वनस्पती पुणे जिल्हय़ाच्या पूर्व भागाची ओळख होती. इंदापूर, दौंड, बारामती या परिसरात ती मोठय़ा प्रमाणात आढळायची, पण आता अनेक कारणांमुळे ती या भागातून हद्दपार झाली आहे. वनस्पती शास्त्रज्ञांच्या दृष्टीने महत्त्वाची व सर्वसामान्यांसाठी कुतुहलाची विषय असलेली ही वनस्पती मोठय़ा प्रमाणावर पाहण्यासाठी आता कोकणचा रस्ता धरावा लागत आहे.
पुणे जिल्हय़ाच्या पूर्व भागात २५ वर्षांपूर्वी ओढे, नाले व ओलसर ठिकाणी लाजाणूचे अस्तित्व मोठय़ा प्रमाणात होते. मात्र, या दोन-तीन दशकात अवर्षणाचे वाढलेले प्रमाण, गावोगावचे नष्ट झालेले ओढे-नाले, उरलेल्या ओढे-नाल्यातून वाळुमाफियांनी केलेला वाळुउपसा व या कारणाने ओढे नाल्यांतील पाणी साठवून ठेवण्याची कमी झालेली क्षमता व त्यामुळे जमिनीतील नष्ट झालेला ओलसरपणा, वाढलेले प्रदूषण आदी कारणाने या परिसरातून लाजाळू वनस्पती नष्ट झाली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्यात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होऊन रासायनिक घटकांचे व क्षारांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणामध्ये आढळत असल्याने या पाण्याचा परिणाम होऊन या वनस्पतीला येथे अखेरची घटका मोजावी लागली आहे.
हाताचा स्पर्श होताच पाणातील पेशी द्रव्य देठात जमा होऊन त्यामुळे पटापट पाने मिटवून घेणारी या तिच्या वैशिष्टय़पूर्ण कारणामुळे लाजाळू म्हणून ओळखली जाते. भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणामध्ये होत असल्याने एकंदरच जमिनीमधून ओलसरपणा नष्ट होत असल्याने व वाढलेल्या प्रदूषणामुळे लाजाळूबरोबरच माळरानावरच आढळणाऱ्या औषधी गुणधर्म असलेल्या अनेक महत्त्वाच्या वनस्पती ही गावोगावच्या शिवारातून हद्दपार झाल्या आहेत. रानरताळ, आगआगी, कडुंदरावन, रानवांगे या बरोबरच आहारात वापरल्या जाणाऱ्या पात्रा, कडवंची या रानभाज्याही नष्ट झाल्या आहेत.