साहित्य संमेलनातील उखाळ्या-पाखळ्या आणि शिवीगाळ पाहिले, की ही संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक आहे की कुस्तीचा आखाडा असा प्रश्न पडतो. समाजावर संस्कार साहित्यिकांनी नाही तर करायचे कोणी, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केला. ज्याच्या पुस्तकांची सर्वाधिक विक्री होते त्यालाच संमेलनाचा अध्यक्ष करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
बेलवलकर हाउसिंगतर्फे ‘ऐसी अक्षरे’च्या दशकपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. ‘एबीपी माझा’चे मुख्य संपादक राजीव खांडेकर, प्रसिद्ध लेखिका आणि या विशेषांकाच्या अतिथी संपादक मोनिका गजेंद्रगडकर, अजित बेलवलकर आणि समीर बेलवलकर या प्रसंगी उपस्थित होते. उत्तरार्धात ‘मराठी अभिमान गीत-एक आनंदयात्रा’ हा कार्यक्रम संगीतकार कौशल इनामदार यांनी सादर केला.
राज ठाकरे म्हणाले, मराठी भाषा ही समृद्ध आहेच. ही भाषेची समृद्धता पोहोचविण्याचे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी बाकीच्या गोष्टी आपण बघाव्यात. रस्त्यावरचे असेल ते मी पाहतो. परदेशातील नागरिकांना त्यांच्या भाषेविषयी असतो, तसा आपल्यालाही मराठीचा अभिमान कडवट असला पाहिजे. हा कडवटपणा आतून असला पाहिजे. केवळ भाषणे करून तो येणार नाही. प्रत्येकानेच ही खबरदारी घेतली, तर भाषा मरते असे बोलण्याची वेळच येणार नाही. मराठी भाषेला ‘ग्लॅमर’ देणे हे आपल्या सर्वाच्याच हाती आहे.
राजीव खांडेकर म्हणाले, आपल्यामध्ये मराठी भाषेचा अभिमान आहे. पण, भाषेवरचे प्रेम कमी झाले आहे. गेल्या काही वर्षांत वाङ्मयचा दर्जा टिकविता आलेला नाही. देश पातळीवर मोहोर उमटवू शकेल असे कवी, नाटककार, कादंबरीकार पटकन सापडत नाहीत. भाषा वापराच्या आळशीपणामुळे अनेक उत्तम शब्द आपण गाडून टाकले आहेत.
महिलांवर अत्याचार होत आहेत. दाभोलकरांच्या खुनातील आरोपी सापडत नाहीत याची चीडही येत नाही इतके आपण निबर जाणिवेचे होत चाललो आहोत, याकडे मोनिका गजेंद्रगडकर यांनी लक्ष वेधले. समीर बेलवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
आमच्या घराण्यात आमचाच असतो
खरे तर मी इथे कसा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आमचे साहित्य वेगळे. हे साहित्य वेगळे. वाचन करतो याचा अर्थ साहित्यावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, असे सांगून राज ठाकरे यांनी गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या पुस्तक प्रकाशनाचे निमंत्रण आपल्याकडे कसे आले याचा किस्सा सांगितला. ‘संगीतातील तुमची घराणी वेगळी. आमची घराणी वेगळी. तुमच्या घराण्यामध्ये कोणीही गायक गायला तरी चालतो. आमच्या घराण्यामध्ये मात्र, आमचाच असतो, असे मी किशोरीताईना सांगितले होते,’ असेही राज ठाकरे म्हणाले.