पोलीस मुख्यालया पाठीमागे अशोक चौकात एका वाडय़ात चालणाऱ्या जुगार अड्डय़ावर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली असता त्या ठिकाणी जुगार खेळताना चक्क पाच पोलीस सापडले. कारवाईच्या भीतीने अन्य तिघे जण पळून गेले.

न्यू पाच्छा पेठेत अशोक चौकात भीमराव पांडुरंग जाधव यांच्या वाडय़ात राजरोसपणे जुगार अड्डा चालत असल्याची तक्रार एका नागरिकाने पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत तांबडे यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर गुन्हे शाखेने जाधव यांच्या वाडय़ातील जुगार अड्डय़ावर धाड टाकली. त्या वेळी जुगार खेळणाऱ्यांमध्ये बहुसंख्य पोलीसच असल्याचे दिसून आल्याने शहर गुन्हे शाखेचे पथक चक्रावून गेले. या धाडीत एका सहायक फौजदारासह अन्य चार पोलीस कर्मचारी जुगार खेळताना सापडले. अन्य तिघे जण कारवाईच्या भीतीने पळून जाण्यात यशस्वी ठरले. हे पळून जाणारेही पोलीसच असल्याचे समजते. या कारवाईत एकूण अकरा जणांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली.

या कारवाईत  सोलापूर ग्रामीणच्या वळसंग पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अल्लाबक्ष सत्तार सय्यद (वय ५६, रा. बोरामणी नाका, रविवार पेठ, सोलापूर) यांच्यासह कामती पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक भरत देवू बागल (वय ३०, रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर), वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रशीद अब्दुल शेख (वय ३२, रा. वैराग, ता. बार्शी), सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाण्यातील राजशेखर शिवप्पा कटारे (वय ४९, रा. राघवेंद्र नगर, विजापूर रोड, सोलापूर) व मदन श्रावण बेलभंडारे (वय ३०, रा. अशोक चौक, सोलापूर) अशी या कारवाईत सापडलेल्या पोलिसांची नावे आहेत.  त्यांच्यासह जुगार अड्डाचालक रमेश पांडुरंग जाधव आणि पळून गेलेल्या अन्य तिघा जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.