Maharashtra Bandh: आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवारी पुण्यात हिंसक वळण लागले. या हिंसाचाराप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी १८५ आंदोलकांना ताब्यात घेतले असून जिल्हाधिकारी कार्यालय, चांदणी चौक येथील हिंसक आंदोलनाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील मराठा संघटनांनी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पुण्यात बंददरम्यान सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर चांदणी चौकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. जमावाच्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी ८३ लोकांना ताब्यात घेतले.

जिल्हाधिकारी कार्यालयातही आंदोलनाला हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एकच्या सुमारास शिष्टमंडळ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन द्यायला गेले. काही आंदोलकांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवले असता आंदोलक आक्रमक झाले. काही तरुण सुरक्षारक्षकाच्या खोलीच्या छतावर चढले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटजवळील सुरक्षा चौकीची तोडफोड केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरील दिवे फोडण्यात आले. तसेच रस्त्यावर टायरही जाळण्यात आला. या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी ५ महिला व ७६ पुरुषांना ताब्यात घेतले आहे.

डेक्कन पोलिसांनी २२ आंदोलकांना ताब्यात घेतले असून खंडोजी बाबा चौक येथील ठिय्या आंदोलनाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. पुण्यात एकूण १८५ आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.