अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या दिलखुलास स्वभावासाठी ओळखले जातात. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उप-मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती आलेल्या अजित पवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये कामाचा सपाटा लावला आहे. रविवारी अजित पवारांच्या हस्ते पुण्यातील कात्रज भागात असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान हर्षवर्धन सदगीर, उप-विजेता शैलेश शेळके आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे यांचा सन्मान करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यात अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत उपस्थितांची मनं जिंकली. “गदा ही पैलवानांच्या खांद्यावर शोभून दिसते, इतरांच्या नाही. पण आज पहिल्यांदाच कधीही कुस्तीचा लंगोट न घातलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिलीत. ती कशी धरावी, कुठे ठेवावी हे देखील मला कळालं नाही.” अजित पवारांच्या या वाक्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यावेळी बोलत असताना अजित पवारांनी क्रीडापटूंचे सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. महाविकास आघाडीचं सरकार खेळाडूंना चांगल्या सोयी-सुविधा आणि नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही पवार म्हणाले.