11 December 2017

News Flash

शेतकरी कर्जमाफीसाठी तृतीयपंथीय सरसावले; मुख्यमंत्र्यांना पाठवणार १००१ पानांचे पत्र

२ मे रोजी अन्नत्याग आंदोलन

प्रतिनिधी, पुणे | Updated: April 21, 2017 7:18 PM

प्रातिनिधीक छायाचित्र

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी, या मागणीसाठी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले असतानाच आता शेतकरी कर्जमाफीसाठी तृतीयपंथीयही सरसावले आहेत. शेतकरी आत्महत्या करत असून, मुख्यमंत्र्यांकडे गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जमाफीची मागणी करत आहोत. पण त्याची दखल घेतली नसल्याने २ मे रोजी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा तृतीयपंथी अंबिका गॅब्रेल यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीसंदर्भात १००१ पानांचे पत्रही पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायच्या असतील तर कर्जमाफी दिली पाहिजे, या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनी भाजप सरकारविरोधात रान उठवले आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला होता. या मुद्द्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ केला होता. यावरून विरोधी पक्षांच्या १९ आमदारांचे निलंबनही करण्यात आले होते. विरोधकांनी अधिवेशनातील कामकाजावर बहिष्कारही घातला होता. त्यानंतर सरकारने १९ आमदारांचे निलंबनही मागे घेतले होते. त्याचदरम्यान, विरोधकांनी राज्यभरातील जवळपास १५ जिल्ह्यांतून संघर्ष यात्राही काढली होती. मात्र, शेतकऱ्यांची आवश्यकता समजून घेतली पाहिजे. कर्जमाफी करून शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा पुरवण्याची गरज आहे, या मतावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. आता विरोधकांसह तृतीयपंथीयांनीही शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी अनेकदा करूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येत्या २ मे रोजी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती गॅब्रेल यांनी दिली. तसेच १००१ पानांचे पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळला पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच सातबारा कोरा करण्यात यावा, अशा मागण्या असून, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ही गंभीर बाब असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे, असेही गॅब्रेल यांनी सांगितले.

First Published on April 21, 2017 7:18 pm

Web Title: maharashtra farmer loan waiver third genders calls protest from 2nd may