मंगळवार पेठेतील भीमनगर परिसरातील दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशामक दलाचे १२ बंब घटनास्थळी दाखल झाले असून, पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्यात येते आहे. दाट लोकवस्ती आणि अरूंद रस्ते यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत आहेत. सिलिंडरच्या स्फोटांमुळे आगीची तीव्रता वाढली. तरीही जवानांनी ८ सिलिंडर घटनास्थळावरून बाहेर काढले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.