‘मराठी शाळा टिकवल्याच पाहिजेत. मात्र, इंग्रजी भाषा ही काही शत्रू नाही. मराठी माध्यमाच्या शाळांतूनही इंग्रजी भाषा उत्तम प्रकारे शिकवली गेली, तर मराठी शाळांबद्दल पालकांच्या मनात विश्वास निर्माण होण्यास मदत होईल,’ असा सूर ‘मराठी शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत रविवारी उमटला. मराठी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी विषयानुसार शिक्षक नेमण्याची गरज शिक्षकांनी या कार्यशाळेत मांडली.
शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, आणि ‘मराठी शाळा टिकल्याच पाहिजेत’ हा फेसबुकवरील समूह यांनी मराठी शाळांच्या सक्षमीकरणाबाबत कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत अभ्यासक, शिक्षक, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी यांच्याबरोबरच पालकही सहभागी झाले होते. मातृभाषेतून शिक्षक का हवेत, मराठी शाळा का, इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा कशा टिकतील, शाळांची गुणवत्ता यासारख्या विषयांवरील चर्चेला शिक्षकांच्या आणि पालकांच्या अनुभवाची जोड मिळाली.
‘इंग्रजी भाषा ही काही शत्रू नाही. मात्र, एखादी संकल्पना ही मातृभाषेतून अधिक चांगली कळते. म्हणून शिकण्याचे माध्यम हे मराठी असावे. पण त्याचवेळी जगातील ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी आवश्यकच आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे इंग्रजी शाळांबरोबरच्या स्पर्धेत टिकायचे असेल, तर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी भाषेचे शिक्षणही चांगले दिले गेले पाहिजे. मराठी शाळांचे ब्रँडिंग करण्याचीही गरज आहे. शिक्षक, आजी-माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळांचे ब्रँडिंग होऊ शकेल.’
‘अनुदानित शाळांमध्ये नवे काही करण्याचा, उपक्रम राबवण्याचा उत्साह फारसा दिसत नाही. मात्र, खासगी विनाअनुदानित शाळा उत्साहाने विविध प्रयोग करतात,’ असे अनुभव पालकांनी यावेळी मांडले. ‘मराठी माध्यमाच्या शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये अनेक ठिकाणी विषयानुसार शिक्षक नाहीत, पुरेशी साधने नाहीत,’ अशा समस्याही उपस्थित शिक्षकांनी यावेळी मांडल्या.