पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे २०२५ मध्ये होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे आता युपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार आहे.
युपीएससीने परीक्षा दिनदर्शिकेद्वारे नागरी सेवा परीक्षा, एनडीए, सीडीए, वनसेवा, भूशास्त्रज्ञ अशा विविध परीक्षांच्या तारखा, परीक्षांची नोंदणी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नागरी सेवा परीक्षा २०२५, भारतीय वनसेवा परीक्षा २०२५ म्हणजेच युपीएससी पूर्व परीक्षा २०२५च्या एकत्रित नोंदणी करू शकतील. ही परीक्षा २५ मे रोजी होणार आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षेतील यशस्वी उमेदवारांसाठी २२ ऑगस्टपासून नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२५ आयोजित केली जाणार आहे.
हेही वाचा…पुण्यात गोळीबाराच्या घटनांनंतर आता कोयता गँगचा राडा सुरू
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (एनडीए-एनए) परीक्षा २०२५ आणि समाईक संरक्षण सेवा (सीडीए) परीक्षा २०२५ साठीची नोंदणी ११ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान करता येणार आहे. त्यानंतर नोंदणीकृत उमेदवारांची परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२५साठीची नोंदणी प्रक्रिया १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत नोंदणी करता येणार आहे. ९ फेब्रुवारीला संयुक्त भू-वैज्ञानिक पूर्व परीक्षा २०२५ होणार आहे. त्यासाठी ४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत नोंदणी करता येणार आहे.