सहाव्या वेतन आयोगात सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या औषधनिर्माण अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या निर्णयानुसार वेतनश्रेणी लागू व्हावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शासकीय औषधनिर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटनेने बुधवारी दिवसभर सामूहिक रजा आंदोलन केले. औषधनिर्माण अधिकाऱ्यांच्या संपामुळे औंध रुग्णालयात औषधे घेण्यासाठी रुग्णांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र होते.
संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सदाशिव मुंढे, उपाध्यक्ष दीपाली महाजन, दीपक कु ऱ्हाडे या वेळी उपस्थित होते. सोमवारी या औषधनिर्माण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. मागण्यांची दखल न घेतली गेल्यास ३० जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे धरून बेमुदत संप करू असा इशारा संघटनेने दिला आहे.
वेतनश्रेणीतील सुधारणांसह पदोन्नतीच्या सध्या उपलब्ध नसलेल्या संधीही उपलब्ध करून द्यावात, अशी मागणीही संघटनेने केली आहे. ग्रामीण रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधनिर्माण अधिकाऱ्यांची पदे वाढवावीत, कंत्राटी सेवेतील औषधनिर्माण अधिकाऱ्यांचे वेतन वाढवावे अशा विविध मागण्या संघटनेने केल्या आहेत. संघटनेचे राज्यात सुमारे ५ हजार सदस्य असून त्यात पुणे शाखेचे २५० सदस्य आहेत.