वाहन चालविण्याचा शिकाऊ व पक्का परवाना मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सध्या ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. मात्र, या यंत्रणेतील विविध त्रुटी लक्षात घेता या ऑनलाईन घोळाचा फटका नागरिकांना बसत असल्याचे दिसते आहे. सध्या वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, परवान्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट हाऊसफुल्ल होत असल्याने अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष परवान्यासाठी चाचणी देण्यासाठी उमेदवारांना तीन ते चार महिने वाट पहावी लागणार असल्याची स्थिती आहे.
वाहन परवाना काढण्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज भरल्यानंतर ऑलनाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागते. त्यानुसार ठरलेल्या वेळेनुसार आरटीओ कार्यालयात जाऊन परवान्यासाठी चाचणी द्यावी लागते. आरटीओ कार्यालयामध्ये एकाच वेळी नागरिकांची मोठी गर्दी होऊ नये त्याचप्रमाणे परवाना काढण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आदी उद्देशाने ही ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली असली, तरी या यंत्रणेतील त्रुटी हळूहळू समोर येत असल्याने योजना राबविण्याचा उद्देशच फोल ठरत असल्याचे दिसते आहे. ऑनलाईन अपॉईंटमेंटची बुकींग दिवसेंदिवस वाढत चालली असून, पुढील तीन ते चार महिन्याच्या अपॉईंटमेंट फुल्ल झाल्या आहेत. त्यात दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे.
शिकाऊ वाहन परवाना काढल्यानंतर सहा महिन्यामध्ये पक्का परवाना काढावा लागतो. सद्यस्थिती लक्षात घेतल्यास वाहन चालविण्याचा पक्का परवाना काढण्यासाठी पुढील तीन ते चार महिन्यांची अपॉईंटमेंट मिळत नाही. सहा महिन्यानंतर अपॉईंटमेंट मिळणार असल्यास त्याचा नागरिकांना फायदा होणार नाही. कारण तोवर शिकाऊ वाहन परवान्याची मुदत संपणार असून, संबंधिताला पुन्हा शिकाऊ वाहन परवान्यासाठीची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे सोयीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली नवी यंत्रणा नागरिकांसाठी गैरसोयीची ठरू शकते. महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे वाहन परवान्याच्या या नव्या पद्धतीला कडाडून विरोध केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य बाबा शिंदे यांनी ही नवी पद्धत तातडीने बंद करून जुनी पद्धत सुरू करण्याची मागणी परीवहन आयुक्तांकडे नोंदविली आहे.

मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अाक्षेप

– परवाना मिळविण्यासाठी पूर्वनियोजित वेळ (अपॉईंटमेंट)घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार पूर्वनियोजित वेळ घेणे कायद्याने बंधनकारक नाही. त्यामुळे परिवहन आयुक्तांनी हे बेकायदेशीर परिपत्रक मागे घ्यावे.
– वाहन चालविण्याच्या पक्क्य़ा परवान्यासाठी तीन ते चार महिन्याच्या अपॉईंटमेंट बुक झाल्यामुळे शिकाऊ परवाना व पक्क्य़ा परवान्याचे कामकाज विस्कळीत झाले आहे. मागेल त्याला शिकाऊ परवाना देण्यात यावा व शिकाऊ परवाना असणाऱ्यांची चाचणी घ्यावी. ऑनलाईन प्रणाली तातडीने बंद करण्यात यावी.
– स्टॉल नावाची प्रणाली अत्यंत किचकट व नागरिकांचा वेळ घेणारी असल्याने ही पद्धत बंद करून ओरिएन्ट पद्धतीचा वापर करण्यात यावा.
– राज्यात होणारी बारा ते पंधरा तासांची वीजकपात लक्षात घेता त्याचप्रमाणे वाडय़ा-वस्त्यांवर सायबर कॅफे, इंटरनेट किंवा मोबाईल सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाईन अपॉईंटमेंट पद्धत योग्य नाही.
– वाहन परवाना काढायचा असल्यास मोबाईल असणे अनिवार्य आहे. कारण संबंधिताच्या मोबाईलवर येणारा सिक्युरीटी कोड अर्जात नमूद करावा लागतो. त्यामुळे ही पद्धत सर्वासाठी उपयुक्त नाही.