परीक्षा परिषदेच्या कारभाराबाबत नाराजी

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेत भरपूर चुका असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे परीक्षा परिषदेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. मात्र, पाचवीच्या प्रश्नपत्रिका क्रमांक १मध्ये जवळपास सहा प्रश्नांमध्ये आणि दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतील पाच प्रश्नांमध्ये चुका होत्या. तर, आठवीच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्येही चार-पाच चुका होत्या, अशी माहिती शिक्षकांनी दिली. विद्यार्थ्यांना ९० मिनिटांत ७५ प्रश्न या प्रमाणे दोन प्रश्नपत्रिकांसाठी १८० मिनिटांत १५० प्रश्न सोडवायचे असतात. अशा वेळी प्रश्नपत्रिकांमध्येच चुका असल्यास त्यांचा वेळ वाया जातो आणि उत्तर येत नाही म्हणून दडपण येते. त्यामुळे प्रश्नपत्रिका निर्दोष असणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. परीक्षा परिषदेतर्फे होणाऱ्या परीक्षांत चुका होण्याचे प्रकार वाढत आहेत हे गंभीर आहे, असेही शिक्षकांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे स्पष्टीकरण परीक्षा परिषद देत असेल, तरी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींचे आणि दडपणाचे काय, असा सवालही शिक्षकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील चुकांसंदर्भात तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांतील चुकांसंदर्भात दोषींना दंड करण्यात आला. त्यामुळे चुकांना किंवा दोषींना पाठिशी घालण्यात येत नाही.

– दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, परीक्षा परिषद