रहिवाशांना नोटिसा पाठवणाऱ्या महापालिकेच्या डेपोमध्ये मोठय़ा प्रमाणात भंगार सामान

शहरात ठिकठिकाणी पडलेले, तसेच शासनाच्याही विविध विभागांकडे साचणारे भंगार सामान डासांच्या निर्मितीसाठी पोषक ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाऊस संपला असला तरी डेंग्यू आणि विशेषत: चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. भंगार साठून देऊन डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या सोसायटय़ा आणि व्यावसायिकांना नोटिसा देणारी व दंड करणारी महापालिका स्वत:च्या घरातील भंगार सामानाची विल्हेवाट लावणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्या व्हेइकल डेपोकडे येणाऱ्या सामानात टायर्स मोठय़ा प्रमाणावर असून या परिसरातील नागरिकांकडून डासांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी आल्याची माहिती कीटक प्रतिबंधक विभागाकडून मिळाली.

महानगरपालिकेने २०१३ मध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार प्रत्येक विभागाकडील टाकाऊ सामानाच्या विल्हेवाटीसाठी एक विभागस्तरीय समिती नेमली जावी, समितीद्वारे सामानाचे मूल्यमापन करून ते व्हेइकल डेपोकडे दिले जावे आणि पुढे व्हेइकल डेपोने सामानाचा लिलाव आयोजित करून त्या-त्या विभागांनी खरेदीदाराकडे भंगार सामान सुपूर्द करावे, अशी ठरलेली पद्धत आहे. परंतु हा लिलाव तब्बल ४ ते ५ वर्षांनंतर मागील आठवडय़ात प्रथमच झाल्याचे पुढे आले आहे.