आडनाव टिळक असले तरी राजकारणात सर्व काही सहज मिळाले नाही. पण टिळक या नावात किती ताकद आहे याची जाणीव लग्न ठरल्याच्या पहिल्या दिवशीच झाली. टिळक या नावावर लोकांचा आजही तेवढाच विश्वास आहे. त्यामुळे टिळक नावाला ‘मार्केटिंग’ची कधीच आवश्यकता भासत नाही, असे मत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी ‘केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मध्ये व्यक्त केले. राजकीय जीवनपट, वैयक्तिक आवडी-निवडी, शहर विकासाची तळमळ, महिलांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोन असे मुक्ता टिळक यांचे विविध पैलू या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडले.

लोकमान्य टिळकांच्या पणत सून असलेल्या मुक्ता टिळक यांना भारतीय जनता पक्षाच्या सत्तेतील पहिल्या महापौर होण्याची संधी मिळाली. या निमित्ताने मुक्ता टिळक यांचा राजकीय प्रवास कसा घडला, त्यांची वैचारिक जडण-घडण कशी झाली, राजकारणातील कडू-गोड अनुभव याबरोबरच वैयक्तिक जीवनात मुक्ता टिळक कशा आहेत, याची माहिती या संवादातून उलगडली. मनमोकळा संवाद आणि दिलखुलास गप्पांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सहज उलगडून दाखवितानाच विविध राजकीय, सामाजिक विषयांवरील मतेही त्यांनी परखडपणे व्यक्त केली. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘लोकसत्ता’चे बातमीदार अविनाश कवठेकर आणि भक्ती बिसुरे यांनी टिळक यांच्याशी संवाद साधला. उपस्थितांनाही महापौरांना प्रश्न विचारण्याची संधी कार्यक्रमात देण्यात आली होती.

‘टिळक कुटुंबीयांनी नेहमीच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले, या कुटुंबातील सर्व व्यक्ती माझ्यासाठी आदर्शच आहेत,’ असे सांगतानाच, टिळक कुटुंबीयांमधील जयंतराव टिळक यांचा दबदबा, त्यांनी बागकामाला दिलेले प्रोत्साहन, कुटुंबात जाती-पात आणि कर्मकांडाला असलेला विरोध, अशा मुद्दय़ांना स्पर्श करीत मुक्ता टिळक यांनी कुटुंबीयांच्या आठवणींना उजाळा दिला.

त्या म्हणाल्या,‘ टिळक कुटुंबातून राजकारणात आले म्हणून राजकारणात मला सर्व काही मिळाले नाही. मलाही त्यासाठी संघर्ष करावा लागला. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा होता. कुटुंबातील सर्वाना त्याची कल्पना दिल्यानंतर मला कोणाकडूनही विरोध झाला नाही. हा निर्णय सांगितल्यानंतर जयंतरावांनी मला मोलाचे सल्ले तर दिलेच, पण राजकारणातील धोक्यांची जाणीवही करून दिली. त्याचा मला आजही फायदा होतो आहे.’

‘सन १९७४-७५ मध्ये झालेल्या घटना दुरुस्तीमुळे महिलांना राजकारणात संधी मिळाली आणि माझाही राजकारणात प्रवेश झाला. राजकारणात काम करताना अनेक गोष्टी मला अनुभवता आल्या. सन २००२ मध्ये पहिल्यांदा महापालिका निवडणुकीसाठी संधी मिळाली. मात्र संध्याकाळी प्रचार करताना घराची ओढ आणि मुलांची काळजी सातत्याने वाटायची. या काळातही मला घरातून पूर्ण साथ मिळाली. त्यामुळेच मी महापौर पदापर्यंतचा प्रवास करू शकले,’ असेही त्या म्हणाल्या. राजकारणी काम करतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. आपले काम, आपले प्रश्न खूप मोठे आहेत, असे सर्वानाच वाटत असते. लोकांच्या समस्या ऐकल्या की त्या किती भयावह आहेत, याची जाणीव होते. ही जाणीव कायम राहिल्यामुळे मी राजकारणात सक्रिय राहिले, असेही त्यांनी सांगितले.

मुक्ता टिळक म्हणाल्या..

* महिलांना राजकारणात संधी आहे, पण आव्हाने पेलण्याची क्षमता महिलांनी स्वत:मध्ये निर्माण करावी.

* तरूणांनी सामाजिक प्रश्न समजावून घ्यावेत.

* शहर विकासासाठी महापौर म्हणून कटिबद्ध.

* सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याची इच्छा.

* राजकारणात यशस्वी होण्यासाठी कष्ट आवश्यक.

* राजकारणात आल्याची खंत नाही.

* सर्व पक्षांत माझे चांगले संबंध.