महापालिका निवडणुकांची संधी साधून त्यात हात धुऊन घेणाऱ्यांमध्ये ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ही मागे राहिलेला नाही. इच्छुक उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन त्यांच्या बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसाठीही ‘पॅकेज’ची तयारी काही वृत्तपत्रांनी केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्याचेही दर उमेदवारांपर्यंत पोहोचणार आहेत. रोज सकाळी सकाळी आपल्या दारात येणाऱ्या, पुढारपणाचा आव आणणाऱ्या, आणि घोटाळ्यात ज्यांचे हात काळे झाले, अशांकडून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांत सध्या राजकीय आणि निवडणुकीच्या म्हणून ज्या ‘बातम्या’ प्रसिद्ध होत आहेत त्यातील अनेक बातम्या या ‘पॅकेज’मधील आहेत.

महापालिका निवडणुकांची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांचे सशुल्क पद्धतीचे प्रचाराचे काम अनेक छोटय़ा-मोठय़ा वृत्तपत्रांनी केले. त्यासाठी इच्छुकांना खास ‘पॅकेज’ देण्यात आली होती. उमेदवाराला हवा तसा, हव्या तितक्या छायाचित्रांसहितचा सुमारे आठशे ते एक हजार चौरस सेंटिमीटर आकाराचा मजकूर प्रसिद्ध करण्यासाठी वृत्तपत्रांनी सव्वा लाख ते अडीच-तीन लाख असा दर ठरवला होता. उमेदवाराने आणून दिलेला मजकूर एकाच दिवशी पूर्ण पानभर, किंवा दोन दिवशी अर्धे पान, किंवा सलग आठ-दहा दिवस एक बातमी अशा पद्धतीने प्रसिद्ध केला जात होता.

त्याचा फायदा घेत अनेक इच्छुकांनी अशा दैनिकांच्या पुरवण्यांमार्फत त्यांचे ‘काम’ त्यांच्या प्रभागात पोहोचवले. त्यातून ते कोणत्या प्रभागात, कोणत्या जागेसाठी इच्छुक आहेत याचीही माहिती पोहोचवण्यात आली. गेल्या पाच वर्षांत प्रभागात  केलेली कामे, आंदोलने तसेच आयोजित केलेले अन्य कार्यक्रम, वैयक्तिक परिचय वगैरेची जाहिरात, मात्र त्याला वृत्तपत्रीय भाषेचा व बातम्यांचा मुलामा असे या पुरवण्यांचे स्वरूप होते. काही दैनिकांनी याच ‘पॅकेज’मध्ये मजकुराच्या प्रसिद्धीबरोबरच उमेदवाराला दोनशे ते पाचशे अंक मोफत देण्याचीही योजना राबवली.

महापालिका निवडणुकीसाठी अर्जाची छाननी झाल्यानंतर आता राज्यातील सगळ्याच ठिकाणचे प्रभागांमधील लढतींचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे उमेदवारांकडून जाहीर प्रचाराबरोबरच वृत्तपत्रीय प्रचारावरही भर दिला जाणार आहे. प्रचाराच्या या काळात उमेदवार त्याच्या जास्तीत जास्त चांगल्या बातम्या वृत्तपत्रात याव्यात तसेच त्याच्या विरोधात काही प्रसिद्ध होऊ नये, यासाठी प्रयत्न करतात. उमेदवारांची ही अपेक्षा लक्षात घेऊन ती संधी साधत काही वृत्तपत्रे येत्या एक-दोन दिवसात उमेदवारांना अनुकूल ठरतील अशा बातम्या देण्यासाठी ‘पॅकेज’ देणार असल्याचे सांगितले जाते. त्याचे दर आधीच्या पॅकेजपेक्षा निश्चितच जास्त असतील.

काही वृत्तपत्रांनी या जाहिरातवजा बातम्यांसाठी त्यांच्या बातमीदारांसाठी, तसेच माध्यम क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीही ‘योजना’ सादर केली आहे. आणलेल्या ‘पॅकेज’च्या रकमेतील २०-२५ टक्के रक्कम अडत (कमिशन) म्हणून बातमीदारांना देऊ करण्यात आली असून उमेदवार जो मजकूर देतील, तो बातम्यांच्या स्वरूपात वृत्तपत्रातून प्रसिद्ध केला जाणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना प्रसिद्धीचे ‘पॅकेज’ देऊ करण्यासाठी बातमीदार तसेच दैनिकांच्या मार्केटिंग विभागातील मंडळी एकत्रच काम करत आहेत. उमेदवारांना भेटून त्यांना वेगवेगळे पर्याय देऊन ‘पॅकेज’ मिळवण्याचे उद्योग ते करीत आहेत.

untitled-26