कष्ट करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधार ठरणाऱ्या रात्रशाळांकडे शासनाचे मात्र दुर्लक्षच होत असल्याचे दिसत आहे. सध्या शिक्षकांचे वेतन करणाऱ्या शालार्थ प्रणालीतील त्रुटींमुळे शहरातील तीनही रात्रशाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही.
संख्येने कमी असणाऱ्या मात्र तरीही कष्ट करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या रात्रशाळांबाबत शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आक्षेप या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी घेतला आहे. शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना, नव्या प्रणाली यामध्ये रात्रशाळांना गृहितच धरले जात नाही. शहरातील तीनही रात्रशाळांमधील शिक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. शिक्षकांचे वेतन करणाऱ्या शालार्थ या प्रणालीतील त्रुटींमुळे शिक्षकांचे वेतन रखडले आहे.
शिक्षकांचे पगार ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या शालार्थ या प्रणालीच्या माध्यमातूनच पुण्यातील शिक्षकांचे पगार करण्यात येतात. या प्रणालीतील तांत्रिक त्रुटींचा फटका मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे. रात्र शाळेतील बहुतेक शिक्षक हे सकाळच्या वेळात पूर्ण वेळ शिकवत असतात तसेच ते रात्र शाळेसाठी अर्धवेळ शिक्षक म्हणूनही काम करत असतात. मात्र नवीन शालार्थ प्रणालीमध्ये एकाच शिक्षकाच्या नावाची दोनदा नोंदणी होत नाही. त्यामुळे रात्रशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांची नावेच या प्रणालीत नोंदली गेली नाहीत. त्यामुळे या शिक्षकांचे पगारच थांबविण्यात आले आहेत. यासाठी मागील महिन्यापर्यंत ऑफलाईन पद्धतीने वेतन देण्यासाठी परवानगी देऊनही शिक्षणाधिकाऱ्यांनी हे पगार मंजूर केले नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. पुण्यात सधारण ६० ते ७० शिक्षकांचे पगार रखडले आहेत.

शिक्षकांचे पगार ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शालार्थ प्रणाली विकसित केली आहे. मात्र रात्र शाळेतील शिक्षक हे सकाळच्या वेळात तसेच संध्याकाळीही अर्धवेळ कार्यरत असतात. या प्रणालीमधे एकाच शिक्षकांचे नाव दोनदा घेण्याची सोय नाही. ही त्रुटी दूर करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत शिक्षकांचे पगार देण्यात येतील. दरम्यान मागील महिन्यापर्यंत ऑफलाईन पगारांना परवागी दिली होती.
सुनील मगर, माध्यमिक शिक्षण सहसंचालक