सायबर कॅफेच्या बंद केबीनमध्ये बसून इंटरनेटच्या महाजालात फेरफटका मारणाऱ्या किंवा संगणकावर विविध कामे करणाऱ्यांना आता ‘प्रायव्हसी’ मिळणार नाही. सुरक्षेच्या कारणावरून शहर पोलिसांनी आता सायबर कॅफेतील ग्राहकांना ही ‘प्रायव्हसी’ न देण्याचे आदेश सायबर कॅफे चालकांना दिले आहेत. पोलिसांनी याबाबत एक नियमावलीच सायबर कॅफे चालकांना दिली असून, कॅफेत येणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शहर पोलिसांकडून विविध पातळीवर सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असून, शहरात यापूर्वी घडलेल्या दहशतवादी कारवायांच्या घटना लक्षात घेता कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. याच उद्देशाने मागील आठवडय़ात पोलिसांनी मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी व सीमकार्ड वितरक व विक्रेत्यांची बैठक घेतली होती. सीमकार्ड देताना पोलिसांनी आता संबंधित ग्राहकांच्या अंगठय़ाचा ठसा घेणे सक्तीचे केले आहे. त्याच पद्धतीने गुन्हे शाखा, सायबर सेल व दहशतवादी विरोधी पथकाच्या पुढाकाराने नुकतीच सायबर कॅफे चालक व इस्टेट एजंटांचीही बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिसांनी नियमावली घालून दिली असून, त्याचे पालन करण्याच्या कठोर सूचना केल्या आहेत. भाडय़ाने घर देताना इस्टेट एजंटांनी पाळावयाच्या नियमांबाबतही पोलिसांनी आदेश दिले आहेत.

सायबर कॅफेबाबतचे नियम
– कॅफेमध्ये येणाऱ्या ग्राहकाला कोणतीही प्रायव्हसी देऊ नये. कॅफेतील संगणकाच्या स्क्रीनवर ग्राहक काय करतो, याची पाहणी कॅफे चालकाने करावी.
– ग्राहकाचे छायाचित्र, मोबाईल क्रमांक, मूळ व तात्पुरत्या पत्त्याची नोंद करावी.
– वारंवार येणाऱ्या ग्राहकाला सदस्य करून कॅफेकडून त्याचे स्वतंत्र ओळखपत्र तयार करावे.
– इंटरनॅशनल चॅटींग करणाऱ्या ग्राहकाबाबत दक्षता घेऊन त्यावर लक्ष ठेवावे.
– कॅफेमध्ये डी अॅन्टी फॉरेन्सिक सॉफ्टवेअर वापरू नये. ‘आय- कॅफे मॅनेजर सॉफ्टवेअर’चा वापर गरजेचा आहे.

– इस्टेट एजंटने घ्यायची काळजी
– घर भाडय़ाने देताना संबंधिताचे मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड व आधारकार्ड घ्यावे.
– भाडेकरू कामाला असणाऱ्या कंपनीचे ओळखपत्र व व्यवसाय करीत असल्यास त्या बाबतची कागदपत्रं पहावीत.
– भाडेकरू ज्या ठिकाणाहून आला असेल त्या ठिकाणी त्याला ओळखणाऱ्या स्थानिक नागरिकांची माहिती देणे बंधनकारक आहे.
– सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्याच्या फोटोसह पोलीस ठाण्यामध्ये भाडेकरूचा अर्ज भरून घेणे सक्तीचे आहे.
– भाडेकरू अर्जावर त्याच्या नातलगांचे किंवा मित्रांचे मोबाईक क्रमांक टाकणे आवश्यक आहे.