दहावी, बारावीच्या परीक्षांप्रमाणेच आता पुणे विद्यापीठाच्या परीक्षांनाही बार कोडची पद्धत सुरू करण्यात येणार असून या सत्रापासूनच बार कोडची पद्धत सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षांसाठीही बार कोड सुरू करण्याची मागणी अनेक वर्ष विविध स्तरामधून सातत्याने केली जात होती. विद्यापीठाच्या निकालामधील गैरप्रकार उघड झाल्यावर या मागणीने अधिकच जोर धरला होता. आमदार मोहन जोशी यांनीही याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आता अखेरीस परीक्षांसाठी बार कोडची पद्धत अवलंबण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
या सत्राच्या परीक्षांची सुरुवात २८ तारखेपासून सुरू होत आहे. सुरुवातीला बॅकलॉगच्या परीक्षेसाठी प्रायोगिक तत्त्वावर बार कोड वापरण्यात येणार आहे. ही परीक्षा यशस्वी झाल्यानंतर बाकीच्या परीक्षांसाठी ही पद्धत वापरण्यात येणार आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या अधिसभेतही बार कोडचा विषय गाजला होता. त्या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी यासंबंधी घोषणा केली होती. ‘‘बार कोड सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी झाली असून त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रणालीची निर्मिती करण्याचे कंत्राट देशातील सर्वात मोठय़ा कंपनीला देण्यात आले आहे,’’ अशी माहिती डॉ. गाडे यांनी दिली.