ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे. आज याच पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग भाजपाकडून एक तास रोखण्यात आला होता. यावेळी मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याने करोना नियमांचे उल्लंघन झाल्याचेही दिसून आले. दरम्यान, एक तासानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना ताब्यात घेऊन इतर कार्यकर्त्यांना आंदोनलस्थळावरून हटवण्यात आलं.

“ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेईन”

आज राज्यभरात भाजपाचे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग भाजपा कार्यकर्त्यांकडून रोखून धरला होता. तर त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. तसेच, पोलिसांकडून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना आंदोलनाबाबत नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, तरी देखील भाजपा कार्यकर्त्यांनी महामार्गावर उतरून एक तास महामार्ग रोखून धरला होता.

Photo : ओबीसी आरक्षणासाठी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भाजपाचं आंदोलन!

तर, एक तास महामार्ग रोखला गेल्याने या मार्गावरील प्रवासी ताटकळत थांबले होते. त्यामुळे त्यांचा संतापाचा पारा चढला होता. वाहनांच्या काही किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याने, टोल नाक्यांवरच आंदोलन का? असा प्रश्न देखील संतप्त प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी उपस्थित केला होता.