महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील गिर्यारोहकांनि पराक्रम केला आहे. नेहमी दोन्ही राज्यात राजकारण तापलेल असत, मुंबईच आणि गुजरातचं नातं तर सर्व सर्वांना माहितच आहे. त्यामुळे वाघ यांनी गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. ९० अंशाची उभी चढाई असलेल्या ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळक्यावर अनिल वाघ आणि त्यांच्या टीमने यशस्वी चढाई केली. सुळक्यावर गेल्यानंतर राष्ट्रगीत आणि भारताचा तिरंगा ध्वज फडकवत त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना चेतवली.


महाराष्ट्राच्या अनिल वाघ, महेंद्र शिंदे, सूरज परब तर गुजरातच्या ऋषीराज मोरी, सागर बुटानी, हार्दिक डोकिया, धवल अहिर, राजू मोडवाडीया आणि रवी सोसारिया या नऊ जणांच्या टीमने ही कामगिरी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील माहूली किल्ल्याच्या पायथ्याशी वजीर सुळका आहे. ज्याची उंची २०० फूट एवढी आहे. तर माहूली किल्ला हा समुद्र सपाटीपासून २८०० फूट आहे. अत्यंत नयनरम्य परिसर असून बाजूला धडकी भरणाऱ्या खोल दऱ्या देखील आहेत. वजीर सुळक्याच्या पायथ्याशी जाण्याकरिता वादरेंगावातून वर चढाई करावी लागते.

अनिल वाघ यांनी आपल्या या खडतर कामगिरीची माहिती देताना सांगितले की, ‘अत्यंत कठीण पायवाट असल्याने आमच्या टीमसमोर बऱ्याच अडचणी आल्या. सुळक्याच्या पायथ्यापर्यंत जाताना अत्यंत दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगलं आणि दोन्ही बाजूने ६०० फूट खोल जीवघेण्या दऱ्या होत्या. मात्र जिद्द न हारता तीन तासांनी वजीर सुळक्याच्या पायथ्याशी येऊन दोन्ही टीम पोहचल्या. परंतू खरा प्रवास तर वजीर सुळक्यावरचा होता.

९० अंशातील २०० फूट उंच भला मोठा वजीर सुळका, महाराष्ट्रातील चढाईसाठी सर्वात अवघड आहे. यात अनुभवी गिर्यारोहक असेल तरच वर चढण्याचे आवाहन पेलवते. अनिल वाघ हे सर्वात अनुभवी होते. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळो लाभले, वजीर सुळक्याच्या पायथ्यापासून टीम मधील एक जण चढाई करून वर गेला त्याला तब्बल तीन तास लागले. त्यानंतर रोपच्या साहाय्याने उर्वरित आठ जणांनी सुळक्यावर चढाई केली. अश्या पद्धतीने या सुळक्यावर चढण्यासाठी त्यांना ऐकून सहा तास लागले.

सुळक्यावर गेल्यानंतर भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन त्यांनी विजयाचा आनंद साजरा करताना राष्ट्रप्रेम चेतवणारे राष्ट्रगीत म्हटले. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत वजीर सुळका दणाणून सोडला. देशप्रेमच आम्हाला सुळक्यावर घेऊन जाण्यासाठी प्रेरणा देत होती असे गिर्यारोहकांनी म्हटले आहे.