िपपरीच्या महापौरपदाचे प्रबळ दावेदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रामदास बोकड व आशा सुपे यांना बुधवारी एक दिवसासाठी का होईना, महापौरपदाच्या खुर्चीवर बसण्याचा ‘मान’ मिळाला. त्याचप्रमाणे, याच संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनाही महापौरपदाची वस्त्रे चढवण्याची ‘संधी’ मिळाली. त्यातही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बुधवारी िपपरी पालिकेच्या तीन सर्वसाधारण सभा होणार होत्या. आचारसंहिता तसेच अन्य कारणांमुळे तहकूब केलेल्या या सभा एकाच दिवशी घेण्यात येणार होत्या. मात्र, सोमवारी २८ तारखेपर्यंत या सभा पुन्हा तहकूबही करण्यात आल्या. या तीन सभांच्या माध्यमातून तीन जणांना सभागृहाचे काम करण्याची संधी मात्र मिळाली.

सध्याचे महापौरपद अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. त्यानुसार शकुंतला धराडे महापौरपदावर आहेत. त्यांची सव्वा वर्षांची निर्धारित मुदत संपली आहे. त्यांच्यानंतर बोकड अथवा सुपे यांना महापौर होण्याची संधी होती, मात्र राजकीय अस्थिरता व गटबाजीच्या राजकारणामुळे धराडे यांना अघोषित मुदतवाढ मिळाली. परिणामी, महापौरपदाची संधी हुकल्याने बोकड व सुपे तीव्र नाराज आहेत.

आता जाता जाता, तहकूब सभेच्या माध्यमातून का होईना, सभागृहात महापौरपदाची वस्त्रे परिधान करून काही काळ कामकाज करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनी समाधान व्यक्त केले. वाघेरे यांना दोन वर्षांत एकदाही सभा चालवण्याची संधी मिळाली नाही, मात्र बुधवारी त्यांचीही इच्छा पूर्ण झाली.