भारतात दवाखाना सुरू करण्यासाठी पाठविलेल्या डॉलरचे सीमाशुल्क भरण्यास सांगून कर्वेनगर येथील एकाची पावणे दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायजेरीयन फसवणुकीचाच हा प्रकार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सुरेश भास्कर आगाशे (वय ५४, रा. दीपा ज्योती कॉलनी, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून डॉ. एलिझाबेथ अल्फ्रेड आणि दीपबेन जॉन केनडी यांच्या विरुद्ध फसवणूक, माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. एलिझाबेथने आगाशे यांनी भारतात दवाखाना सुरू करायचा असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी आगाशे यांना ईमेल पाठवून जागा बघण्यासाठी सांगितले.  जागा पाहण्यास आगाशे यांनी होकार कळविला. जागेसाठी डॉलर पार्सलमध्ये पाठविले असून त्याचे सीमाशुल्क भरण्यासाठी दीपबेन जॉन केनडीच्या खात्यावर पैसे भरावेत, असा निरोप आरोपींनी दिला. त्यानुसार आगाशे यांनी केनडीच्या खात्यावर वेळोवेळी पैसे भरले. मात्र, नंतर काहीच संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार वारजे पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आगाशे यांनी भरलेल्या बँकेच्या खात्याची चौकशी सुरू असून ते पैसे काढले का याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली.