पुणे : सत्ताधारी पक्ष बदलल्यानंतरही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसंबंधित विषयांचे महत्त्व शासनाला पटवून देण्यासाठी ५ ते १० जानेवारी दरम्यान ऑनलाइन मतदान घेण्याचा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. या मतदानाचे निष्कर्ष शासनाला सादर करून मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

एमपीएससी स्टुडंट्स राइट्स या व्यासपीठाच्या माध्यमातून ऑनलाइन मतदानाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी संयुक्त परीक्षा विभक्त करण्यात यावी का, महापरीक्षा संकेतस्थळाच्या केवळ त्रुटी दुरुस्त न करता हे संकेतस्थळ कायमस्वरूपी बंद करावे का, राज्यसेवेत सी सॅट हा विषय केवळ पात्रतेसाठीच ठेवण्यात यावा का, अशा प्रश्नांवर ऑनलाइन मतदान घेतले जाणार आहे. एपीएससी स्टुडन्ट राइट्सच्या फेसबुक पान आणि युटय़ूब वाहिनीवर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मतदान करता येईल.

ऑनलाइन मतदानाचा कल, निष्कर्षांचा तपशील राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती एमपीएससी स्टुडन्ट राइट्सचे किरण निंभोरे, महेश बडे, साई डहाळे, विजय मते यांनी दिली.