मूळ सातारचे आणि कामानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेला बाबर परिवार शहरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. माजी खासदार गजानन बाबर तीन वेळा नगरसेवक होते. त्यांचे दोन बंधू तसेच एक भावजयही एकापाठोपाठ नगरसेवक राहिले. या वेळी मात्र त्यांच्या कुटुंबातील कोणीच महापालिकेत नाही, असे प्रथमच घडले आहे. अशावेळी प्राधिकरण प्रभागातून भाजपच्या उमेदवारीवर बाबरांच्या भावकीतील शर्मिला राजेंद्र बाबर या गृहिणी प्रथमच महापालिकेत निवडून आल्या आहेत.

गजानन बाबर नगरपालिका असताना सर्वप्रथम नगरसेवक झाले. त्यानंतर १९८६ आणि १९९२ मध्ये त्यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले. याच कालावधीत ते विरोधी पक्षनेतेही होते. नंतर बाबर आमदार व खासदारही झाले. पुढे, महापालिकेतील त्यांचा वारसा त्यांचे बंधू मधुकर बाबर यांनी चालवला, ते २००२ मध्ये निवडून आले. २००७ मध्ये दुसरे बंधू प्रकाश बाबर निवडून आले. २०१२ मध्ये प्रकाश यांच्या पत्नी शारदा बाबर निवडून आल्या. यंदा शारदा बाबर आणि मधुकर बाबर यांचे चिरंजीव योगेश बाबर रिंगणात होते. तथापि, दोघांचाही पराभव झाला. त्यामुळे यंदा गजानन बाबर परिवारापैकी कोणीच महापालिकेत प्रतिनिधित्व करणार नाही. याचवेळी, बाबर यांच्याच मूळ किकली (तालुका – वाई, सातारा) गावचे रहिवासी असलेल्या राजेंद्र बाबर यांच्या पत्नी शर्मिला भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. त्या मूळ शिवसेनेच्या होत्या. शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी भाजपकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व खासदार अमर साबळे यांच्या मध्यस्थीने त्यांना उमेदवारी मिळाली व त्या निवडूनही आल्या. त्यामुळे बाबर परिवारातील नवा चेहरा महापालिकेत दाखल आहे.