पुणे : पीएमपीच्या चालकांकडून प्रवाशांना उर्मट वर्तन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतानाच एका ज्येष्ठ दाम्पत्यालाही चालकाने धमकाविल्याचा प्रकार पुढे आला आहे. ज्येष्ठ दाम्पत्याला गाडीत चढण्यास उशीर झाल्यामुळे चालकाने वाद घालून शिवीगाळ केली. त्यामुळे संबंधित चालकाविरोधात पीएमपी प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून पीएमपी प्रशासनानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. चालकाकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा आल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे पीएमपीकडून सांगण्यात आले.

अप्पा बळवंत चौक ते जुनी सांगवी या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस फेरीवेळी महापालिका भवन येथे शरद (वय ७८) आणि सुधा महाजन (वय ७६) हे सांगवीला जाण्यासाठी बसथांब्यावर मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उभे होते. बस थांब्यावर येताच बसमध्ये चढण्यासाठी महाजन दाम्पत्याला थोडा उशीर झाला. त्यावरून बसचालक आणि त्यांच्यात वाद सुरु झाला. कंबरेची शस्त्रक्रिया झाल्यामुळे आणि वयोपरत्वे जलद चालता येत नसल्याचे सुधा महाजन यांनी चालकाला सांगितले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत बसचालकाने त्यांच्या वयाचा विचार न करता त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गाडीचे ब्रेक दाबून तुमचे दात पाडीन अशी धमकीही त्यांना दिली. केवळ धमकी देऊनच हा चालक थांबला नाही तर प्रवासात किमान तीन-चारवेळा मुद्दामहून ब्रेक दाबून चालकाने त्यांना धमकाविले. त्यामुळे घाबरलेल्या महाजन दाम्पत्याने त्यांचा मुलगा नीलेश याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. महाजन दाम्पत्य घाबरल्यामुळे आणि मानसिक त्रास झाल्यामुळे त्यांनी नीलेश याच्यामार्फत पीएमपी प्रशासनाकडे तक्रार नोंदविली आणि गुंडगिरी करणाऱ्या बसचालकावर कारवाई करण्याची मागणी केली. मुद्दामहून ब्रेक दाबल्यामुळे विपरीत घटना घडण्याची शक्यताही होती, असे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले.

या प्रकाराची पीएमपी प्रशासनाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली. महाजन यांच्याबाबत घडलेल्या घटनेचा अहवाल पीएमपी प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. तो वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. चालकाकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

खुलासा आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. दरम्यान, यासंदर्भात बोलताना नीलेश महाजन म्हणाले,की ज्येष्ठ नागरिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्याची आणि त्यांना धमकाविण्याची मजल जातेच कशी. त्यामुळे संबंधित चालकावर तातडीने कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. दरम्यान, संबंधित चालकावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.