बदली करण्याचा अधिकार शासनाचा आहे. त्यामुळे बदलीला घाबरून मी माझं काम कधीच थांबवत नाही. मी नियमाच्या बाहेर जाऊन कधीही काम करत नाही. मला दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो, असे मत पुणे-पिंपरी चिंचवड परिवहन महामंडळाचे (पीएमपीएल) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. मी कायद्याच्या चौकटीत काम करतो. अडथळे येतात, त्या पार करण्याच्या पद्धती आहेत आणि हे सर्व करताना मला सेल्फ मोटिवेशन कामाला येतं. तेच माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी बेस्ट देण्याचाच प्रयत्न करतो, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता (पुणे) कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी आपल्या आजवरच्या कारकीर्दीचा व पीएमपीएलमधील भविष्यातील योजनांविषयी संवाद साधला.  ते म्हणाले, मला शासनाने फंक्शन व रोल दिले आहेत. मी १० ते ६ या वेळेत काम करतो ते फंक्शन आहे. पण माझा रोल २४ बाय ७ आहे. त्याप्रमाणे मी काम करणे अपेक्षित आहे. मीच जर व्यवस्थित काम केलं नाही तर माझे कर्मचारी कसं करतील असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मी काम करताना पब्लिक इंटरेस्ट आहे की प्रायव्हेट इंटरेस्ट हे सर्वात प्रथम पाहतो. त्यामुळे योग्य काम करणे सोपे जाते. बदली होणारच हे मी आयएएस होतानाच स्वीकारले होते. फक्त एकाच ठिकाणी मी जास्त वेळ राहत नाही, असे त्यांनी मिश्किलपणे सांगितले.
आपल्या कामात आयटीचा उपयोग केल्यास खूप फायदा होऊ शकतो. जिथे मनुष्याचा हस्तक्षेप वाढतो. तिथे अकार्यक्षमता व भ्रष्टाचाराला मोकळं रान मिळतं, असेही ते म्हणाले. नवी मुंबईत असताना परिवहनचे काम सांभाळले असल्यामुळे त्याचा पीएमपीएलबरोबर काम करताना उपयोग होईल, असे सांगत पुणे परिवहनसाठी नव्याने अॅपही विकसित केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. प्रवासी केंद्रीत आपले काम असून प्रवाशांनीही त्याप्रमाणे आम्हाला सहकार्य करणे हे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.