22 October 2020

News Flash

शहरात प्रथमच साकारली कवितेची बाग

ज्यांच्या कविता या बागेत लावण्यात आल्या आहेत अशा डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. संगीता बर्वे, आश्लेषा महाजन आणि हेमा लेले या कवयित्रीही या वेळी उपस्थित होत्या.

शहरातील पहिली कवितेची बाग मंगळवारपासून काव्यरसिकांना आणि शालेय 19kavita1विद्यार्थ्यांना खुली झाली. एरंडवणे येथील कमला नेहरू उद्यानात ही पहिली वहिली कवितेची बाग साकारली असून ‘पुस्तकाच्या पानांमधून उठून कविता बागेत आली याचा खूप आनंद होत आहे,’ असे मनोगत कवयित्री अरुणा ढेरे यांनी या बागेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. चित्रांच्या समवेत असलेल्या कविता शिकणे इथे येणाऱ्या मुलांसाठी नक्कीच आनंददायी ठरेल. अभ्यासापलीकडचे मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या या गोष्टी मुलांच्या हाती देणे हेच सजग पालकत्व आहे, असेही प्रतिपादन ढेरे यांनी या वेळी केले.
प्रभाग क्रमांक ३६ मधील कमला नेहरू उद्यानात मंगळवारी या बागेचे उद्घाटन झाले. स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या कल्पनेतून, खास मुलांसाठी ही आगळी -वेगळी बाग साकारली आहे. तीन वर्षे मनात असलेली कवितेची बाग आज प्रत्यक्षात आल्याचे समाधान वाटत आहे. अतिशय सृजनशील असे हे काम आहे. या बागेत तीस कविता आपल्याला भेटतील. मान्यवर कवी-कवयित्रींच्या या निवडक निसर्ग कविता आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात, इथे मुलांना खेळता खेळता भाषेची गोडी लागेल, असा विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. शहरातील विविध शाळांमधील शिक्षकांनी मुलांना येथे सहलीला घेऊन यावे आणि या कवितेच्या बागेची सर मुलांना घडवावी, मुलांच्या भाषा विकासाला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी शिक्षकांना केले. रवी घैसास या चित्रकाराच्या चित्रांमुळे बागेत साकारलेल्या कविता अधिकच सुंदर भासत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात ‘कोण लावते आकाशात नक्षत्रांच्या ज्योती?’ ही कविता अरुणा ढेरे यांनी सादर केली. ज्यांच्या कविता या बागेत लावण्यात आल्या आहेत अशा डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. संगीता बर्वे, आश्लेषा महाजन आणि हेमा लेले या कवयित्रीही या वेळी उपस्थित होत्या. त्यांनी कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांनी उपस्थित मुलांकडूनही कविता म्हणवून घेतल्या. माधव राजगुरू, शिरीष चिटणीस, सुभाष लेले, भारती पांडे, नीलिमा शिकारखाने आदींची कार्यक्रमात उपस्थिती होती. चित्रकार रवि घैसास, उद्यान विभागाचे अधिकारी पवार, तुमाले तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी इनामदार, कसबे, येनपुरे यांचा अरुणा ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 3:20 am

Web Title: poet garden in ward no 36
Next Stories
1 मुरुड दुर्घटनेप्रकरणी आझम कॅम्पसच्या संचालकासह सतरा जणांविरुद्ध गुन्हा
2 राज्य पुरातत्त्व विभाग ८० दुर्ग संवर्धनासाठी ताब्यात घेणार
3 मुरुडमध्ये समुद्रात विद्यार्थी बुडल्याप्रकरणी संस्थाचालक, शिक्षकांवर गुन्हा
Just Now!
X