News Flash

रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे मोर्चाला परवानगी नाही

स्वाभिमानी रिक्षा व वाहतूक संघटनेच्या सोमवारी होणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

स्वाभिमानी रिक्षा संघटनेला पोलिसांचे पत्र; परवानगीविना मोर्चा काढण्यावर संघटना ठाम
एखाद्या मोर्चामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल किंवा सणांचे दिवस असतील, तर पोलिसांकडून त्याला परवानगी नाकारण्यात येते. मात्र, पुणे पोलिसांनी एक अजबच कारण देत स्वाभिमानी रिक्षा व वाहतूक संघटनेच्या सोमवारी होणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होणार असल्याचे कारण पोलिसांनी दिले आहे. हे कारण दिल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, परवानगीशिवाय मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वाभिमानी रिक्षा व वाहतूक संघटनेच्या वतीने ओला व उबेर या खासगी कंपन्यांच्या विरोधात सोमवारी रिक्षा चालकांचा रिक्षांसह मोर्चा काढण्यात येणार आहे. बाणेर येथून पुणे विद्यापीठ चौक, शिवाजीनगर, पुणे मनपा या मार्गाने प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून रीतसर परवानगी मागण्यात आली होती. मात्र, ही परवानगी नाकारत असल्याचे पत्र विशेष शाखेचे पोलीस आयुक्त विक्रम पाटील यांनी संघटनेला दिले आहे. मोर्चाना विविध कारणांनी पोलीस परवानगी नाकारतात, पण या मोर्चाला परवानगी नाकारताना दिलेले कारण काही निराळे असल्याने त्याची चर्चा होत आहे.
‘रिक्षाची रॅली वाहतुकीच्या मुख्य रस्त्यांवरून आयोजित केली असून, सध्या पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या रिक्षाच्या रॅलीमुळे आणकी वाहतूक कोंडी होऊन वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा होणार आहे. त्यामुळे रॅलीस परवानगी नाकारण्यात येत आहे,’ असे पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
संघटनेचे जिल्हध्यक्ष कमलेश ससाणे यांनी याबाबत सांगितले, की ‘‘मोर्चात किती रिक्षाचालक व रिक्षा सहभागी होणार याची माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून दूरध्वनी करण्यात आला होता. आम्ही ती माहितीही दिली. मात्र, परवानगी नाकारण्यात आली. मोर्चा जाणार असलेल्या कोणत्याही रस्त्यावर खड्डे नाहीत. तरीही खड्डय़ांमुळे परवानगी नाकारण्यात आली. आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम आहोत. रिक्षा चालकांच्या ठरलेल्या संख्येपेक्षा जास्त रिक्षा चालकांना आता मोर्चात सहभागी करून घेतले जाणार असून, काही घडल्यास त्याची जबाबदारी पोलिसांवर राहील.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 2:41 am

Web Title: police not allow morcha due to pothole
Next Stories
1 हवाई दलाच्या बेपत्ता विमानात निगडीतील कुणाल बारपट्टेंचा समावेश
2 जुन्यांचा सन्मान राखून नव्यांना संधी – रघुनाथ कुलकर्णी
3 कोशाध्यक्षांविना अंदाजपत्रकास मंजुरी
Just Now!
X