वार्षिक परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना देण्यासाठी पूना नाईट हायस्कूलमध्ये यंदा खास समारंभ घडवून आणण्यात आला.. या  समारंभाचे वेगळेपण हे होते की अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिवसा कोठे तरी काम करून रात्री शिक्षण घेणाऱ्या आणि परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे खास कौतुक या समारंभात केले जात होते.. हे कौतुक होते श्रमिकांच्या गुणांचे.. त्यांच्या जिद्दीचे..
कामगार विद्यार्थ्यांच्या निकाल वाटपाचा हा समारंभ पूना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट कनिष्ठ महाविद्यालयात साजरा झाला. या शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी दिवसा कष्ट करतात, कोठेतरी छोटी-मोठी नोकरी करतात.  चार पैसे मिळवतानाच त्यांची शिकण्याची जिद्द जराही कमी झालेली नाही. म्हणूनच त्यांच्या पाठीवर दिली गेलेली कौतुकाची थाप वेगळी ठरली. या नाईट हायस्कूलमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयात मिळून २९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात आठवीमध्ये यंदा मयूर अडसूळ प्रथम आला, नववीत स्वाती चव्हाण पहिली आली. तिने ७४ टक्के गुण मिळवले आहेत आणि अकरावीत तानाजी धिंडले प्रथम आला. त्याला ८१ टक्के गुण मिळाले आहेत. आठवीत पहिला आलेला अडसूळ क्विन्स गार्डनमध्ये काम करतो, तर तानाजी धिंडले तुळशीबागेतील एका बांगडय़ांच्या दुकानात काम करतो. अकरावीत ७० टक्के गुण मिळवून दुसरा आलेला अनिकेत कदम एका हॉटेलमध्ये काम करतो.
शाळेच्या झांजले सभागृहात झालेल्या या समारंभाचे आयोजन प्राचार्य गंगाधर रासगे तसेच मानसिंग गायकवाड, दामोदर मकाशिर, देवराम चपटे यांनी केले होते. कामगारांचे नेते आणि रिक्षा पंचायतचे निमंत्रक नितीन पवार समारंभाचे प्रमुख पाहुणे होते, तर अध्यक्षस्थानी प्रसेनजित फडणवीस होते. सरस्वती मंदिर संस्थेने वंचितांसाठी रात्र शाळा सुरू केली आहे आणि शाळेची माहिती अधिकाधिक गरजूंना दिली गेली तर त्यांचीही निश्चितच प्रगती होईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. कॉमेडी बुलेट ट्रेनमधील विनोदी कलाकार आशुतोष वाडेकर याने अभिनयाला याच शाळेतून सुरुवात केल्याचे सांगितले. स्वत:तील गुण ओळखून ते वाढवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करा असेही आवाहन त्याने केले. भारताच्या अर्थव्यवस्थेत साठ टक्के वाटा असंघटित कामगारांचा आहे. हे कामगार असंघटित आहेत आणि ते प्रशिक्षितही नाहीत. सरस्वती मंदिरमध्ये मात्र अर्थार्जन आणि त्याच बरोबरीने ज्ञानार्जन करणारेही विद्यार्थी आहेत, अशा शब्दात नितीन पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा काही ना काही कारणाने सुटलेली असते. पुढे त्यांना शिक्षणाचे महत्त्व लक्षात येते आणि अशी मुले शाळेत प्रवेश घेतात. शिक्षण घेण्याची जिद्द आणि चिकाटी अतिशय वाखाणण्यासारखी असते आणि म्हणूनच हे विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतात.
– प्राचार्य गंगाधर रासगे