केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्य़ातील १६ विभागातील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील २३३.६६ कोटी रुपयांच्या विविध कामांचा आराखडाही मंजूर करण्यात आल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले.
केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत जिल्ह्य़ातील पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी, जुन्नर, दौंड, सासवड, जेजुरी, भोर, बारामती, शिरूर, इंदापूर त्याचप्रमाणे खडकी, देहूरोड व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवड करण्यात आली आहे. या विभागातील वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व सक्षमीकरणासह क्षमता विस्तार करणे, वीजहानी कमी करणे व योग्य दाबाने चोवीस तास वीजपुरवठा ही उद्दीष्ठ ठेवण्यात आली आहेत.
योजनेत समावेश झालेल्या या विभागांमध्ये नऊ नवे वीज उपकेंद्र, २७ उपकेंद्राचे आधुनिकीकरण, १५६ किलोमीटर नव्या वाहिन्या व वाहिन्यांचे विभाजन, ३५ किलोमीटर वाहिन्यांची क्षमतावाढ, ६८ किलोमीटर लघुदाब वाहिन्या, ८५ किलोमीटर ११ केव्ही वाहिन्या, ३१० नवीन वितरण रोहित्रे, २५९ किलोमीटरच्या भूमिगत वाहिन्या, नवे लघु व उच्चदाब फिडर पिलर तसेच फिडरमधून वीजजोडण्या, नवीन वीजमीटर, रोहित्र व वाहिन्यांचे खांब बदलण्याची कामे करण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही कामे होणार आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर या विभागातील वीजग्राहकांना चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.