डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेले ‘बाप’ गमवल्यासारखे पोरकेपण..न पटलेला विचारच संपवण्याची समाजातील वृत्ती कशी बदलता येईल याबद्दलची तगमग..आणि काहीही झाले तरी नवीन विचार मांडण्याचे आम्ही थांबवणार नाही हा निर्धार..अशा भावपूर्ण वातावरणात एस. एम. जोशी सभागृहापासून ओंकारेश्वर मंदिरापर्यंत मूक मोर्चा काढून मराठी नाटय़ आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी दाभोलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. श्रीराम लागू, दीपा श्रीराम, सुमित्रा भावे, ज्योती सुभाष, सुनिल सुकथनकर, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, अतुल पेठे, माधव वझे, समर नखाते, विद्या बाळ, गीताली वि. मं., असीम सरोदे या वेळी उपस्थित होते.
डॉ. दाभोलकर यांच्यावर अंधश्रद्धाविरोधी चळवळीबाबत टोकाची भूमिका घेतल्याची टीका होत असे, परंतु त्यांचे विचार अंधश्रद्धेपेक्षाही मुळात शोषणाच्याच विरोधात असल्याचे सुनिल सुकथनकर यांनी सांगितले. कलाकारांनी आपला कलानिर्मितीचा विचार पुन्हा तपासून पाहून समाजात चुकीचे संदेश जाऊ नयेत याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
सुमित्रा भावे यांनी सांगितले,‘प्रेक्षकांच्या वृत्तीत बदल घडवण्याची माध्यमांची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी माणसांच्या मनात शिरण्याचा अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. न पटणारा विचार संपवू पाहणाऱ्या माणसांचे हृदयपरिवर्तन कसे होईल, हा प्रश्न वरवर भोळा वाटला तरी महत्त्वाचा आहे. अशा वेळी आपला अहिंसेवरचा विश्वास दृढ करणे आवश्यक आहे.’  
गिरीश कुलकर्णी म्हणाले,‘‘दाभोलकरांच्या जाण्यामुळे पोरकेपणाबरोबरच कृतिशील होण्याच्या जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली आहे. कलानिर्मिती करताना समाजाशी बांधिलकी बाळगणे आवश्यक आहे.’’
चळवळी अस्तंगत होण्याच्या काळात कार्यकर्त्यांची मोट बांधून चळवळ यशस्वीपणे पुढे नेणे आणि समाजाशी जोडलेली नाळ तुटू न देणे हे दाभोलकर यांचे वैशिष्टय़ असल्याचे अतुल पेठे यांनी नमूद केले.