लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यावर उभारलेल्या मेघडंबरीच्या उद्घाटनावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून १२ जानेवारीला ठरलेला उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी पुणे शहर जिल्हा मातंग समाजातर्फे देण्यात आला आहे. उद्घाटनाचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.
सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे मेघडंबरी तसेच सुशोभीकरण आणि समूहशिल्प प्रकल्पाचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी ठरवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. मात्र, मेघडंबरीसह अनेक कामे अपूर्ण असल्यामुळे या उद्घाटनाला मातंग समाजातील विविध संस्था-संघटनांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. नगरसेवक अविनाश बागवे तसेच हनुमंत साठे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
मेघडंबरीजवळील समूहशिल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, सुशोभीकरणा अंतर्गत जी कामे करण्याचे नियोजन होते ती कामेही अपूर्ण आहेत, सीसी टीव्ही कॅमेरे बसलेले नाहीत तसेच मेघडंबरीचेही काम अपूर्ण आहे. या मुख्य कामांसह आणखी पंधरा कामे पूर्ण झालेली नाहीत. सर्व पदाधिकाऱ्यांनी बुधवारी या ठिकाणी भेट देऊन केलेल्या पाहणीत या उणिवा दिसल्या. फक्त उद्घाटन करता यावे म्हणून घाईने कामे पूर्ण असल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे घाईगर्दीने उद्घाटन करू नये, अशी मागणी असल्याचे बागवे यांनी सांगितले. उद्घाटन कोणी करावे याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र, काम अपूर्ण असताना उद्घाटन केले जाऊ नये. कामे पूर्ण करून त्यानंतर उद्घाटन व्हावे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला विरोध असल्याचे पत्रही महापौरांना देण्यात आले असून राजकीय श्रेय घेण्यासाठी कोणी उद्घाटनाचा प्रयत्न केल्यास कार्यक्रमाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.