सायबर भामटय़ांकडून सामान्यांना गंडा घालण्याचे सत्र सुरू आहे. कोंढवा परिसरातील एका प्राध्यापक महिलेला दुबईहून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने भामटय़ांनी एक लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान येरवडा परिसरातील एका महिलेची अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे.

या संदर्भात कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर राहणाऱ्या एका प्राध्यापक महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अजयकुमार, रंजनकुमार आणि सुरेंद्रकुमार या भामटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या माध्यमातून प्राध्यापक महिलेची आरोपी अजयकुमार याच्याशी ओळख झाली होती. तिने शहानिशा न करता ओळख वाढविली. त्यानंतर अजयकुमार याने तिला दुबईहून भेटवस्तू पाठवितो, असे आमिष दाखविले. त्याचे साथीदार रंजनकुमार आणि सुरेंद्रकुमार यांनी तिच्याशी संपर्क साधला. भेटवस्तू मिळविण्यासाठी काही पैसे भरावे लागतील, असे त्यांनी महिलेला सांगितले. त्यानुसार तिने त्यांच्या बँक खात्यावर वेळोवेळी एक लाख सात हजार रुपये भरले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक वर्षांराणी पाटील तपास करत आहेत.

येरवडय़ात राहणाऱ्या एका महिलेची अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. भामटय़ांनी तिला भेटवस्तू देण्याच्या आमिषाने ९६ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार जेम्स जितू मार्क आणि त्याच्या साथीदार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

आयफोन देण्याच्या आमिषाने तरुणाला गंडा

स्वस्तात आयफोन देण्याच्या आमिषाने एका तरुणाची बारा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. मिलन थुमर (वय ३०, रा. आंबेगाव खुर्द, कात्रज) यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजमेर आलम आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आलम आणि त्याच्या साथीदार महिलेने स्वस्तात आयफोन विक्रीची जाहिरात एका संकेतस्थळावर दिली होती. या आमिषाला तो बळी पडला. आरोपी आलम याने त्याला बारा हजार रुपयांमध्ये आयफोन देण्याचे आमिष दाखविले होते. त्याने सांगितल्यानुसार मिलन याने एका महिलेच्या बँक खात्यात बारा हजार रुपये भरले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.