मंडई, बेलबाग चौक भागांत चोरटय़ांचा सुळसुळाट

गौरी तसेच सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर मंडई, बेलबाग चौक भागांत भाविकांची गर्दी उसळते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ते बाबू गेनू चौक दरम्यान पाय ठेवायला जागा नसते. उत्सवाच्या कालावधीत भाविकांकडील दागिने लांबवणारी चोरटय़ांची टोळी सक्रिय झाली असून, गुरुवारी वेगवेगळय़ा घटनांत चोरटय़ांनी भाविकांकडील दीड लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे.

गणेशोत्सवात मोबाइल चोरी, महिलांच्या पर्समधील दागिने लांबवणे, खिसे कापणे अशा प्रकारचे गुन्हे घडतात. अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी उत्सवाच्या काळात बाहेरगावावरून आलेली चोरटय़ांची टोळी सक्रिय असते. गेल्या वर्षी या भागात मोबाइल चोरी, दागिने लांबवण्याचे गुन्हे मोठय़ा प्रमाणावर घडले होते. यंदाही परगावातील चोरटय़ांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी या भागात वेगवेगळय़ा घटनांत चोरटय़ांनी भाविकांकडील दागिने आणि रोकड लांबवली.

हडपसरमधील फुरसुंगी भागातील रहिवासी अमृता ढवकळ (वय ३२) या सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या गळय़ातील एक लाखाचे मंगळसूत्र चोरटय़ाने लांबवले. मंडई भागात रात्री साडेआठच्या सुमारास बालिकेच्या गळय़ातील सोनसाखळी चोरटय़ांनी लांबवल्याची घटना घडली. या संदर्भात भवानीशंकर बेहरा (वय ३६, रा. वानवडी) यांनी या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवानीशंकर सहकुटुंब मंडई भागातून निघाले होते. त्यांच्या पत्नीच्या कडेवर मुलगी होती. चोरटय़ांनी गर्दीचा फायदा घेऊन मुलीच्या गळय़ातील तीस हजारांची साखळी लांबवली.

कार्यकर्त्यांच्या खिशातील रोकड लंपास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मांडवात गुरुवारी सकाळी कार्यकर्त्यांच्या खिशातील पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. स्वप्नील फुगे (वय ४६, रा. बुधवार पेठ) यांनी या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फुगे हे मांडवात काही मान्यवरांचा सत्कार करत होते. त्या वेळी चोरटय़ाने गर्दीचा फायदा घेऊन खिशातील पंचवीस हजारांची रोकड लांबवली.

पोलिसांच्या सूचना

गौरी विसर्जनानंतर मध्यभागात गर्दी उसळते. शनिवारी (२ सप्टेंबर) आणि रविवारी (३ सप्टेंबर) या भागात मोठी गर्दी होईल. या भागात चोरटय़ांची टोळी सक्रिय असल्याने भाविकांनी काळजी घ्यावी. महिलांनी गर्दीत शक्यतो मौल्यवान दागिने घालू नयेत. दागिने घातल्यास सतर्क रहा. लहान मुले तसेच पर्सकडे लक्ष ठेवावे. शक्यतो वरच्या खिशात मोबाइल संच ठेवू नये. बेवारस वस्तूंना हात लावू नये. संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्वरित बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.