दांडेकर पूल येथे कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले असून त्या ठिकाणच्या लोकांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून तीन कोटीची मदत दिली जाणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, तेथील नागरिकांना एक महिन्याचे रेशन दिले जाणार आहे. घटनास्थळाचे पंचनामे झाले आहेत. त्यानुसार त्यांना मदत केली जाणार आहे. महापालिकेकडून प्रत्येक कुटुंबाला अकरा हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दांडेकर पूल येथील कालवा फुटल्याने अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे. या कालव्याची योग्य वेळी दुरुस्ती झाली असती तर अशी घटना घडली नसती. याला हे सरकार आणि पालकमंत्री जबाबदार असल्याचे काल घटनास्थळी भेट दिल्यानंतर अजित पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली होती.
अजित पवारांच्या टीकेला गिरीश बापट म्हणाले की, पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी मला कळते तसेच यात कोण काय बोलले याला योग्य वेळी उत्तर देईन. मला यात राजकारण आणायचे नसून अजित पवारांनी इतक्या वर्षांत काय केले हे आपल्याला माहिती आहे. २० वर्षे त्यांनी काय दिवे लावले आहेत अशा शब्दात पालकमंत्री गिरीश बापट यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

तर ते पुढे म्हणाले की, कालवा नेमका कशामुळे फुटला याची माहिती घेणार असून उद्यापर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे. अशी दुर्घटना भविष्यात घडू नये. यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.