ठाण्याचा कुख्यात गुंड सादिक बंगालीला पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. सादिक बंगालीकडे स्टेनगनसह ५० हून अधिक जीवंत काडतूसे आणि ५ पिस्तूल देखील जप्त करण्यात आल्या आहेत. बंगाली विरोधात ठाणे ग्रामीण पोलिसांत खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. रवि पुजारी टोळीतील कुख्यात गुन्हेगार सादिक बंगाली स्वारगेट पोलिस स्थानक परिसरातील सातारा रोड येथील बस स्थानकावर अग्नी शस्राची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी सातारा बस स्थानकावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सादिक बंगाली याच्या सॅकमध्ये एका स्टेनगनसह पाच पिस्तूल आणि ५९ जीवंत काडतुसे सापडली. सादिक आणि त्याचा साथीदार ज्या मोटरसायकलवरुन या ठिकाणी आले होते. हत्यार विक्रीसाठी बसस्थानकावर आलेल्या सादिककडे असणारी मोटरसायकल लोणावळ्यातून चोरी केल्याची माहिती देखील पोलिस तपासात समोर आली आहे. ऐरोलीचे नगरसेवक देविदास चौगुले हत्याकांडातील पाच आरोपीमध्ये सादिक बंगाली याला पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून शस्त्रपुरवठा झाल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती.