प्रेयसीवर खर्च करण्यासाठी पैसे हवेत म्हणून चोरी करणाऱया एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १८ लॅपटॉप, ६ एलईडी, ९ मोबाईल व सोन्याचे दागिने असा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रतीक हिराचंद लिडकर (वय २२, रा. भोसरी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
त्याच्याकडून सांगवी, निगडी, एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच चाकण, तळेगाव, खराडी, चंदननगर, परिसरातही घरफोड्या केल्याचे आरोपी सांगत आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोड्याच्या घटना वाढल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकाने लिडकर याला सांगवीत घरफोडी करताना रंगेहात पकडले. त्याच्याकडे तपास केल्यानंतर नऊ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. त्याच्याकडून सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रेयसीवर खर्च करण्यासाठी पैसे पुरत नसल्याने घरफोडी करीत असल्याची माहिती लिडकर याने दिल्याचे पोलीसांनी सांगितले.