प्रामाणिक रिक्षा चालकाने एका प्रवाशाचे रिक्षात राहिलेली २५ हजार रुपयांची रोख रक्कम परत करून माणुसकी शिल्लक असल्याचे उदाहरण दिले आहे. दशरथ रामचंद्र कुरकुटे असे ७८ वर्षीय प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव आहे. प्रवासी सविता डफाळ या आपली पैशांनी भरलेली पर्स रिक्षात विसरल्या होत्या. ती रिक्षा चालक दशरथ यांनी सांगवी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी सविता यांच्याशी संपर्क साधून त्यांची पर्स परत केली. यानंतर सविता यांनी कुरकुटे यांना ५०० रूपयांचे बक्षिस देत त्यांना धन्यवाद दिले. दरम्यान, कुरकुटे यांचा प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शुक्रवारी दुपारी, दशरथ रामचंद्र कुरकुटे यांच्या रिक्षातून सविता डफाळ यांनी साई चौक ते पिंपळे गुरव बस स्थानकापर्यंत रिक्षातून प्रवास केला. आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर त्या फोनवर बोलत खाली उतरल्या आणि पर्स तिथेच विसरून निघून गेल्या. त्यांची पर्स राहिलेली लक्षात आल्यानंतर कुरकुटे यांनी त्यांना हाक मारली. परंतु त्यांचे लक्ष त्यांच्या हाकेकडे गेले नाही. त्यानंतर त्या दुसऱ्या गाडीत बसून दुसरीकडे निघून गेल्या. परंतु काही वेळाने सविता यांना आपल्याकडे पर्स नसल्याचे ध्यानात आले. तो पर्यंत दशरथ कुरकुटे हे सांगवी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी सर्व हकीकत सांगत २५ हजार रुपये असलेली पर्स पोलीसांच्या स्वाधीन केली.

दरम्यान, सविता यांनी कुरकुटे यांची माहिती घेत त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते सांगवी पोलीस ठाण्यात असल्याचे समजले. घटनेची माहिती घेत पोलिसांनी त्यांची पर्स त्यांना परत केली. दशरथ यांचा प्रामाणिकपणा पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर सविता यांनी त्यांचा प्रामाणिकपणा पाहून ५०० रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत. दरम्यान, दशरथ हे गेल्या ४० वर्षांपासून रिक्षा चालवत असून कुटुंबाचं आर्थिक उणिवा भागवत आहेत. त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा खरच कौतुकास्पद असून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.