13 December 2017

News Flash

चोरीस गेलेले दागिने वाढदिवशी परत मिळाले..

वाढदिवसाच्या दिवशी चोरटय़ाने हिसकावलेले मंगळसूत्र परत मिळाले.

प्रतिनिधी, पुणे | Updated: October 11, 2017 1:46 AM

पुणे पोलिसांकडून शहरातील विविध गुन्हय़ांमध्ये चोरटय़ांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज मंगळवारी एका कार्यक्रमात तक्रारदारांना परत करण्यात आला. या वेळी तक्रारदार लक्ष्मी खुडे यांना ऐवज देण्यात आला. या प्रसंगी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, रवींद्र सेनगांवकर, शशिकांत शिंदे उपस्थित होते.

पाच किलो सोन्याचे दागिने तक्रारदारांना परत

मार्केटयार्ड भागातील रहिवासी अलका नंदकुमार गुडमेट्टी यांचे साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले.. हिसकावलेले मंगळसूत्र एक दिवस परत मिळेल, याची खात्री नव्हती..मात्र, अलका यांच्यासाठी आजचा दिवस खास ठरला.. वाढदिवसाच्या दिवशी चोरटय़ाने हिसकावलेले मंगळसूत्र परत मिळाले..

पुणे पोलिसांकडून शहरातील विविध गुन्हयांमध्ये चोरटय़ांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज मंगळवारी एका कार्यक्रमात तक्रारदारांना परत करण्यात आला. पोलिसांकडून ७४ गुन्हय़ांमधील पाच किलो ७४३ गॅ्रम सोन्याचे दागिने , ७८८ ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोकड असा एक कोटी ८१ लाख ३ हजार ८७७ रूपयांचा ऐवज परत करण्यात आला. या प्रसंगी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, शहर पोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, रवींद्र सेनगांवकर, शशिकांत शिंदे उपस्थित होते.

या प्रसंगी तक्रारदारांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले. अलका गुडमेट्टी म्हणाल्या, की ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन होता.  मी मैत्रिणींसोबत फिरायला गेले होते. त्या वेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार चोरटय़ांनी माझे साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यानंतर मी पतीसोबत जाऊन मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मंगळसूत्र परत मिळण्याची शाश्वती मला वाटत नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मंगळसूत्र चोरटे सापडल्याची माहिती दिली. क्षणभर माझा विश्वास बसला नाही. पोलिसांकडून माझे मंगळसूत्र वाढदिवसाच्या दिवशी परत मिळाले. पोलिसांनी दिलेली ही अनोखी भेट आहे. सन २००५ मध्ये चोरटय़ाने माझे दागिने हिसकावून नेले. पोलिसांकडून चोरटय़ाला पकडण्यात आले आणि एक तपानंतर दागिने परत मिळाले, असे जयश्री जयवंत (वय ८०) यांनी सांगितले.  वडिलांनी माझ्या लग्नात बारा तोळे दागिने दिले होते. मोलकरणीने घरातील चावी लांबविली आणि कपाटात ठेवलेले दागिने लांबविले. ही घटना मी कार्यालयातून दुपारच्या वेळी घरी आले तेव्हा उघड झाली. चोरी झाल्याचे पाहून मी सुन्न झाले. चतु:शृंगी पोलिसांकडून या गुन्ह्य़ाचा तातडीने तपास करण्यात आला. मोलकरणीला ताब्यात घेण्यात आले. माझे दागिने परत मिळाले, असे सनदी लेखापाल भाग्यश्री साठे यांनी सांगितले. प्रमिला बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले.

पोलिसांवर विश्वास ठेवा..

चोरलेला ऐवज चोरटय़ाकडून जप्त करून तक्रारदारांना परत करणे, ही पोलिसांची जबाबदारी आहे. दीड वर्षांत तक्रारदारांना ऐवज परत करण्याचे पाच कार्यक्रम आयोजित करण्यात आले. चोरटय़ांना पकडण्यासाठी पोलीस दिवस-रात्र तपास करतात. पोलिसांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

तीन कोटी सतरा लाखांचे दागिने परत

यंदा तक्रारदारांना दागिने परत करण्याचा तिसरा कार्यक्रम पोलिसांकडून आयोजित केला. यंदाच्या वर्षी आतापर्यंत तक्रारदारांना तीन कोटी सतरा लाख सत्तर हजार रूपयांचा ऐवज परत करण्यात आला. साखळी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.

 

First Published on October 11, 2017 1:46 am

Web Title: pune woman get her stolen jewelry on his birthday