राष्ट्रीय रोड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी रेसिंग सायकल भेट

पुणे : वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घरी परतलेल्या प्रियंकाला गेले वर्षभर सायकलिंगच्या सरावापासून वंचित राहावे लागले. मात्र, क्रीडा संघटक अनिरुद्ध देशपांडे यांनी राष्ट्रीय रोड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी रेसिंग सायकल भेट दिल्याने प्रियंकाच्या चाकांना प्रोत्साहनाची गती मिळाली आहे.

शालेय स्पर्धामध्ये सहभाग घेतलेली प्रियंका आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलपटू झाली आहे. विविध स्पर्धामध्ये विजय संपादन करत तिने दिल्लीतील क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रवेश मिळवला. तेथे उत्तम प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्याने ७ सुवर्णपदक, ७ रौप्यपदक यांसह केरळ येथे झालेल्या नॅशनल ट्रॅक चॅम्पियनशिप २०१६ चे सुवर्णपदक जिंकले. केवळ परिस्थितीमुळे आपल्या स्वप्नापासून गेले वर्षभर दूर राहावे लागलेल्या प्रियंकाला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय रोड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पाच लाख रुपयांची रेसर सायकल अमनोरा येस फाउंडेशनतर्फे भेट देण्यात आली.प्रियंका म्हणाली, शिबिरातून बाहेर पडल्यावर वैयक्तिक सायकल नसल्याने सरावात खंड पडला. आता भेट मिळालेल्या सायकलमुळे नव्या जोमाने सराव करून येत्या राष्ट्रीय स्पर्धेतही पुण्याचा ठसा उमटवायचा आहे.