दिल्ली येथे एका महिलेवर रेडिओ कॅबमध्ये अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी मंगळवारी रेडिओ कॅब चालकांची बैठक घेतली. यामध्ये त्यांना विविध सूचना करीत त्यांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
दिल्ली येथे रेडिओ कॅबमध्ये एका महिलेवर चालकाने बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यानंतर रेडिओ कॅबमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी रेडिओ कॅब चालकांची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस आयुक्त सतीश माथुर, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड आणि रेडिओ कॅबचे मालक उपस्थित होते. शहरात पाचशे ते सहाशे रेडिओ कॅब आहेत.
या बैठकीत रेडिओ कॅब चालकांकडून सुरक्षिततेसाठी केल्या जाणाऱ्या उपययोजनांचा पोलिसांकडून आढावा घेण्यात आला. या वेळी रेडिओ कॅब चालकांना सूचना करण्यात आल्या. त्यामध्ये वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना म्हणजेच स्मार्टकार्ड असले पाहिजे. ज्या चालकांकडे असा परवाना नसेल त्यांनी तो त्वरित काढून घ्यावा. प्रवशांकडून सेवा घेतल्यानंतर फीडबॅक देण्याची सुविधा असावी. ज्या वाहन चालकांची पोलीस चारित्र्य पडताळणी करून तीन वर्षे झाली आहेत, त्या चालकांनी पुन्हा पोलीस चारित्र्य पडताळणी करावी. त्यांनी या वेळी त्यांचे आधारकार्ड सादर करावे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाताना त्यांची विशेष काळजी घ्यावी. सर्व रेडिओ कॅब चालकांची यादी परिवहन कार्यालयाकडे असावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.