उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शनिवारी रात्री उशिरा पडलेल्या जोरदार पावसाने दिलासा दिला. त्यातच रविवारी रात्री शहर आणि पिंपरी परिसरात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसास सुरूवात झाली. दरम्यान, वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील संपूर्ण आठवडा पुण्यासाठी पावसाचा ठरण्याची शक्यता आहे. वेधशाळेने पुढील सहा दिवसांसाठी वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सर्व दिवस शहर व परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारनंतर, तर मंगळवारी संध्याकाळी वा रात्री काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर शनिवापर्यंत देखील काही ठिकाणी पाऊस पडू शकेल.
हा पाऊस उन्हाची तलखी आणखी कमी करणार असल्याचे दिसून येत आहे. या आठवडय़ात कमाल तापमान लक्षणीयरीत्या उतरणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. बुधवापर्यंत दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकेल, त्यानंतर ते कमी होऊन शनिवापर्यंत ३० अंशांवर येण्याची शक्यता आहे.