चांगल्या गोष्टी कालातीत असतात. वृत्तपत्र आल्यावर मी पहिल्यांदा ‘चिंटू’ पाहतो. माझ्या मुलांकडे चिंटूची पुस्तके असायची. ‘चिंटू’ला ना काळाचे बंधन आहे आणि ना वयाची अट, अशी भावना प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केली. सतत हसतमुख असलेल्या प्रभाकर वाडेकर याला नवीन शोधायचा ध्यास होता. ‘आनंद’ चित्रपटातील ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं’ हा संवाद तो जीवनामध्ये जगला, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी प्रभाकरच्या आठवणींना उजाळा दिला.
‘चिंटू’चे सहनिर्माते प्रभाकर वाडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून चित्रकार चारुहास पंडित यांनी भरविलेल्या ‘मैत्र जीवाचे’ या चिंटू हास्यचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, चित्रा वाडेकर, चिंटू चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले या वेळी उपस्थित होते. ‘धूमधडाका चिंटू’ आणि ‘कलंदर चिंटू’ या पुस्तकांचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. घोले रस्त्यावरील न्यू आर्ट गॅलरी येथे रविवापर्यंत (११ ऑगस्ट) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
मी येथे पक्षाचा अध्यक्ष किंवा व्यंगचित्रकार म्हणून नाही तर मित्राच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी आलो आहे. चिंटू सुरू ठेवणे हीच प्रभाकरला श्रद्धांजली ठरेल, असे राज ठाकरे म्हणाले.
या मराठी मातीमध्ये चिंटू जन्माला आला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्येही चित्रमालिका गाजली, असे फडणीस यांनी सांगितले. चिंटू चित्रमालिकेद्वारे अभिजात विनोदाची निर्मिती केली असल्याची भावना गोडबोले यांनी व्यक्त केली. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार आणि चारुहास पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. संजय सावरकर यांनी आभार मानले.